
उत्तराखंडमध्ये सात वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. सात वर्षांपूर्वी ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. आता चमोलीतील रेणी गावाजवळ हिमनग कोसळल्यामुळे हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेत 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. हे सर्वजण ऋषीगंगा प्रकल्पात काम करत होते.
पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहत गेल्याने ते बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अनेक पूल तुटल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे हिमनग म्हणजे नेमके काय आणि ते कसे कोसळतात असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
उंचावरील डोंगराळ प्रदेशात एकच ठिकाणी वर्षानुवर्षे हिमवृष्टी झाल्याने त्याचे हिमनगात रुपांतर होते. हिमनग अल्पाइन आणि आइस शिट्स अशा दोन प्रकारचे असतात. पर्वतांवरील हिमनग अल्पाइन प्रकारचे असतात. अनेक वर्षांची हिमवृष्टी आणि नेहमीचे उणे तापमान यामुळे अनेक वर्षांनंतर हिमनग हे पर्वताचाच एक भाग बनतात.
हे हिमनग कोसळण्याच्या मागे अनेक कारणे असतात. त्यातील मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हिमनगांवर दबाव येतो आणि ते कोसळतात. त्याचप्रमाणे जागतिक समस्या असलेली तापमानवाढ हेदेखील हिमनग कोसळण्यामागचे प्रमुख कारण आहे. जागतिक तापमानवाढीचा हिमनगांवर परिणाम होत आहे.
तापमानवाढीमुळे हिमनगांवरील बर्फ वितळण्यास सुरुवात होते. त्यामुळे हिमनगाचा भाग पर्वतांपासून वेगळा होत कोसळतो. अनेकदा हिमनगाचा लहानसा भाग कोसळत असल्याने ते लक्षात येत नाही. मात्र, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास हिमनगाचा मोठा भाग कोसळतो आणि उत्तराखंडसारख्या दुर्घटना घडतात.
हिमनग कोसळल्यानंतर त्यात साचलेले पाणी स्वतःचा मार्ग शोधते. त्यामुळे हिमनग दुभंगतो आणि त्यातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि त्याचा वेग वाढतो. हे पाणी नदीला मिळत असल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि वेग यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी होते.
अनेक लहान हिमनग कोसळण्याच्या घटना दररोज पर्वतीय ठिकाणी होत असतात. मात्र, मोठा हिमनग कोसळण्याच्या घटना तीनचार वर्षांतून एख्याद्यावेळी घडतात. अनेक नैसर्गिक आपत्तीप्रमाणे या घटनांबाबत कोणतेही अंदाज वर्तवता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजनेला वेळ मिळत नाही.




























































