
लेह – लडाखला राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीत समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी केंद्र सरकारविरोधात सांगतो व्यक्त केला आहे. सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. यावरच बोलताना गीतांजली जे आंगमो म्हणाल्या आहेत की, “ते फक्त एका हवामान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले होते, जे संयुक्त राष्ट्र आणि एका पाकिस्तानी मीडिया हाऊसने आयोजित केले होते.”
गीतांजली जे आंगमो म्हणाल्या की, केवळ हवामान परिषदेत सहभागी होऊन एखादी व्यक्ती आयएसआय एजंट कशी बनू शकते? लडाख पोलिसांनी सोनम वांगचुक हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. यावर उत्तर देताना त्या असं म्हणाल्या आहेत.
गीतांजली म्हणाल्या की, “हे पूर्णपणे खोटे आहे आणि मी त्याचा निषेध करते.” त्या म्हणाल्या, “सोनम वांगचुक यांना अडकवण्यासाठी एक बनावट कथा तयार केली जात आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, या सरकारने एकदा सोनम वांगचुक यांचा सन्मान केला होता. त्यांना तत्कालीन ऊर्जामंत्री आरके सिंह यांच्याकडून पुरस्कार मिळाला होता. तेव्हा हे सरकार आंधळे होते का? सोनम वांगचुकच्या संपर्कात असलेल्या एका पाकिस्तानी हँडलरला पोलिसांनी अटक केल्याच्या लडाख डीजीपींच्या विधानाला उत्तर देताना गीतांजली यांनी ही टिप्पणी केली.