फणसाडच्या अभयारण्यात पक्षी किती? शुक्रवारपासून गणना; पक्षीप्रेमीसाठी पर्वणी

फणसाड वन्यजीव अभयारण्यात एकूण किती पक्षी आहेत याची इत्यंभूत माहिती लवकरच कळणार आहे. जंगलात अधिवास करणारे स्थानिक दुर्मिळ जलपक्षी, स्थलांतरित पक्षी यांची आधारभूत स्थिती, त्यांच्या विविधतेचे मूल्यांकन आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी ग्रीन वर्क्स ट्रस्ट आणि महाराष्ट्र वनविभाग (ठाणे वन्यजीव विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फणसाड पक्षीगणना’ उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हा उपक्रम येत्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

एसबीआय फाऊंडेशनच्या ‘CONSERW’ कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात पक्षीप्रेमी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत पक्षांची गणना करणार आहेत. यामध्ये सामान्य नागरिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून पक्ष्यांचे निरीक्षण करणार आहेत. आतापर्यंत २५० हून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यात रातवा, बेडूकमुखी, गिधाडे, मल बारी, धनेश आदींचा समावेश आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/jec6pdQBU5i8ypKF7 या लिंकवर जाऊन जाऊन अर्ज भरावा.

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध क्षेत्र आहे. सिटिझन सायन्स या संकल्पनेचा मूळ उद्देशच हा आहे की सामान्य नागरिकांना सहभागी करून घेणे. या पक्षीगणनेच्या माध्यमातून संकलित होणारा डेटा हा केवळ आकडा नसून तो भविष्यातील संवर्धन आराखडा तयार करण्यासाठी एक महत्त्वाचा वैज्ञानिक दस्तावेज ठरेल.
– डॉ. निखिल भोपळे, व्यवस्थापकीय विश्वस्त, ग्रीन वर्क्स ट्रस्ट