तुमच्या एका मताची किंमत माहितीये का? मतदान न केल्याने देशाला कोट्यवधींचे नुकसान

67

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 91 जागांसाठी मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 97 जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावा यासाठी निवडणूक आयोग विविध क्लुप्त्या लढवत आहे. परंतु कितीही जागृती केली तर मतदानाचा आकडा काही ठिकाणी कमीच राहतो.

अनेक वेळा मतदार माझ्या एकट्याच्या मतदानाने काय होणार असा विचार करून मतदानाला जात नाही. काही तर सुट्टी असते म्हणून मजामस्ती करण्यासाठी मतदान न करता फिरायला जातात. परंतु तुम्ही मतदान न केल्याने स्वत:चेच नाही तर देशाचे देखील नुकसान होते हे माहिती आहे का?

देशातील सर्वात पहिली लोकसभा निवडणूक 1952 ला झाली आणि यासाठी जवळपास 10 कोटी 45 लाख रुपयांचा खर्च आला होता. तर गेल्या म्हणजेच 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 3870 कोटींचा खर्च आला होता. आता सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 6500 कोटी म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा जवळपास दुप्पट खर्च होण्याची शक्यता आहे.

पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारामागे 0.60 पैशांचा खर्च आला होता. तर 2014 मध्ये हाच खर्च प्रत्येक मतदारामागे 46 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारामागे जवळपास 72 रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. मतदान न करता तुम्ही स्वत:सह देशाचेही नुकसान करत आहात. अशाच पद्धतीने जर एका मतदारसंघात 1000 लोकांनी मतदान केले नाही तर 72 हजारांचे नुकसान होते. हा आकडा अतिशय मोठा आहे, कारण आजही आपल्या देशात कोट्यवधी लोकं संधी असतानाही मतदान करत नाहीत. हिशोब केला तर आकडा एका नजरेत वाचता येणार नाही एवढा होईल आणि हे नुकसान फक्त आणि फक्त मतदान न केल्यामुळे आपल्या देशाला सहन करावे लागते. त्यामुळे नक्की मतदान करा.

आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीचा खर्च पाहुया –

वर्ष               खर्च

1952 –    10.45 कोटी रुपये
1957 –    5.9 कोटी रुपये
1962 –    7.32 कोटी रुपये
1067 –    10.62 कोटी रुपये
1971 –    11.62 कोटी रुपये
1977 –    23.04 कोटी रुपये
1980 –    54.77 कोटी रुपये
1984 –    81.51 कोटी रुपये
1989 –    154.2 कोटी रुपये
1991 –    359 कोटी रुपये
1996 –    597.34 कोटी रुपये
1998 –    666.2 कोटी रुपये
1999 –    947.7 कोटी रुपये
2004 –    1016.1 कोटी रुपये
2009 –    1114.4 कोटी रुपये
2014 –    3870 कोटी रुपये

आपली प्रतिक्रिया द्या