
आपण योग्य सरावाने आपल्या शब्दांची वेगमर्यादा नियंत्रणात आणू शकतो. यासाठी प्रगट वाचनाचा खूप चांगला उपयोग होतो. आपल्या बोलण्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाला अतिशय महत्त्व आहे. असे म्हणतात की, धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून वापरलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणूनच बोलत असताना त्या शब्दांमधून निर्माण होणारे वाक्य आणि त्यातून श्रोत्यांनी घेतला जाणारा अभिप्रेत अर्थ काय असेल या सगळ्याचा अंदाज लावूनच आपल्याला आपले मुद्दे मांडायचे असतात.
आजकाल तर सोशल मीडियाच्या जगात वापरल्या जाणाऱ्या माध्यमांमधून तुम्ही पाठवलेल्या संदेशांमध्ये सांगायचे एक असते आणि समोरच्याला कळते ते काही वेगळेच. या करिता महत्त्वाचे मुद्दे हे संदेश न पाठवता नेहमी थेट बोलणे योग्य ठरते. आपल्या बोलण्यातून श्रोत्याला अभिप्रेत अर्थ कळाला की नाही याची पडताळणी करणे हे वक्त्याचे कर्तव्य असते. म्हणूनच आपल्या बोलण्याचा वेग हा एका विशिष्ट मर्यादेचा असावा.
वेग मर्यादा तीन प्रकारच्या असतात. जलद, मध्यम आणि संथ. एक चांगला वक्ता होण्या साठी तुम्हाला तुमच्या श्रोत्यांच्या आकलनशक्ती नुसार, तुमच्याकडे असणाऱ्या शब्दभांडरा नुसार आणि त्याहूनही महत्त्वाचे समोरच्या श्रोत्यांची मानसिकता, त्याची शैक्षणिक अर्हता, त्यांचा त्या क्षेत्रातला अनुभव आणि त्याची त्या विषयाची आवड या सगळय़ा गोष्टींचा विचार करून तुम्हाला तुमच्या बोलण्यात प्रति मिनिट तुमच्या शब्दांचा वेग ठरवायचा असतो. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या वैचारिक मंचावर बोलत असाल तर तुमच्या प्रति मिनिट शब्दांचा वेग अधिक असला तरी चालतो. पण तुम्ही एखादा नवीन विषय एखाद्या नव्या श्रोत्यांच्या वर्गासमोर किंवा लहान मुलांसमोर मांडत आहात त्या वेळी तुम्हाला तुमच्या शब्दांची वेगमर्यादा ही मध्यम किंवा कमी ठेवावी लागते.
वरिष्ठ पदावरील मंडळी म्हणूनच एकतर कमी बोलतात किंवा बोलताना एक विशिष्ट वेगमर्यादा ठेवून आपले मुद्दे मांडतात. एखादा मुद्दा आपण न वाचता मांडत असतो तेव्हा आपली वेग मर्यादा जास्त असते, पण ठरवलेले मुद्दे किंवा विषय मांडण्यासाठी मात्र आपल्याला विचार करून बोलावे लागत असल्यामुळे आपली वेगमर्यादा कमी असते.
शब्द हे अस्त्रासारखे असतात, त्यामुळे ते जपून वापरले जाणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही प्रति मिनिट किती शब्द बोलता आणि त्यातले कुठपर्यंत लोकांना समजत आहे यावरच तुमच्या बोलण्याचे यश अवलंबून असते. तेव्हा आजपासून प्रत्येक शब्द जपून बोला आणि तुमचे बोलून झाल्यावर त्याचा अभिप्रेत अर्थ समोरच्या श्रोत्याला नीट कळाला की नाही याचा पडताळा देखील नक्की करा. स्वतःचा व्हिडीओ/ऑडिओ ऐका आपल्या बोलण्याचा व्हिडीओ किंवा ऑडिओ बनवून आपल्या शब्द मर्यादेचा वेग किती आहे हे ऐकून जर आपण समोरचा श्रोता असतो तर ते आपल्याला तितक्या वेगात समजले असते का ? वापरलेला वेग हा खूप संथ आहे? खूप जलद आहे का ? या विषयीचा निर्णय आपल्याला घेता येतो.
किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक