खरं सोनं ओळखा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना अाॅनलाईन । मुंबई

लग्नसराईचा मोसम आला की सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढते. सोन्याला किंमत असते हे खरं, पण ते शुद्ध असेल तरच… काहीवेळा सोन्यासारखं दिसत असूनही ते सोनं नसतं. अशावेळी खरं सोनं कसं ओळखायचं ते पाहूया…

नायट्रीक ऑसिडनेही खरे सोने आणि खोटे सोने ओळखता येते. सोन्यावर पीनने हलकासा चर्रा पाडायचा आणि त्यावर नायट्रीक ऑसिडचा एक थेंब टाकून पाहा. सोने हिरवे झाले तर ते खोटे, पण जर त्या सोन्यावर काहीच प्रभाव पडला नाही तर ते खरे…

सोन्याची शुद्धता सिरामिक थाळीनेही तपासता येते. त्यासाठी आपल्याकडे तशी थाळी असली पाहिजे. त्यावर सोन्याचा दागिना घासा. थाळीवर जर काळा डाग पडला तर तुमचे सोने खोटे आहे. पण या थाळीवर सोनेरी रंगाचे डाग पडले तर तुमचे सोने अस्सल आहे असे समजावे.

सोन्याची पारख अगदी सोप्प्या पद्धतीने करायची तर ते सोने दातांमध्ये धरून दाबून ठेवा. त्यावर दातांची खूण दिसली तर ते खरे समजावे. कारण खरे सोने अतिशय नाजूक असते. पण त्यात इतर धातू मिसळले तर ते कठीण होते.

टीप्स

सोने खरे की खोटे ते पाण्याच्या टेस्टनेही तपासून पाहाता येते. एका भांडय़ात दोन ग्लास पाणी घ्या. त्यात सोन्याचा दागिना टाका. सोने तरंगले तर ते धादांत खोटे आहे. पण हाच दागिना जर भांडय़ाच्या तळाला जाऊन बसला तर ते खरे समजावे. कारण खरे सोने तरंगत नाही.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्याची मॅग्नेट टेस्ट करता येईल. कारण खरं सोनं चुंबकाला चिकटत नाही. सोन्याजवळ चुंबक नेलं आणि सोने त्याकडे आकर्षित झाले, तर समजावे की त्यात भेसळ आहे.