
आंब्याच्या सिझनमध्ये आंब्याचा शिरा, आंब्याचा रस, आंब्याचे आइस्क्रीम, मिल्क शेक यांसारखे अनेक पदार्थ आपण करतो आणि जेवणाची लज्जत वाढवतो. कैरीचे लोणचे, मेथांबा, साखरांबा असे अनेक पदार्थ आपण आवर्जून सिझन संपण्याआधी वर्षभर तयार करून ठेवतो. पण आंब्याची जेली किंवा जाम करतोच असे नाही. घाईच्या वेळी नाश्ता म्हणून कधी ब्रेडला लावून हा जाम खाता येतो. घरातील सगळ्यांनाच पोळीसोबतही हा जाम खाता येतो. एवढेच नाही तर आंब्याची ही रेसिपी वर्षभर टिकणारी आहे. अचानक घरी पाहुणे आले आणि गोड काही नसेल तर आपण गोड पदार्थ म्हणून त्यांच्या पानात हा पदार्थ वाढला तर त्यांनाही तो अतिशय आवडू शकतो. शिवाय झटपट होणारा आणि कोणतेही प्रिझर्वेटीव्ह नसलेला आंब्याचा हा जाम घरी कसा तयार करायचा ते पाहूया. कमीत कमी पदार्थांमध्ये होणारा हा चविष्ट जाम कसा तयार करायचा याच्या दोन पद्धती आहेत.
तोतापुरी आंब्याचा फोडींचा जाम
तोतापुरी आंबा आकाराने मोठा असतो याची कोय पातळ असल्याने त्यामध्ये बराच गर असतो. तोतापुरी आंब्याची साले काढून बारीक फोडी करून घ्यायच्या. एका पातेल्यात आंब्याच्या फोडी ज्या प्रमाणात आहेत त्याहून थोडी कमी साखर घेऊन साखर बुडेल इतकेच पाणी घालून पाक करायचा. पाक होत आला की, त्यामध्ये या पिकलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या. आवडीप्रमाणे केशर, वेलची पावडर घालून हे सगळे एकत्र चांगले शिजू द्यायचे. जाम एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गार झाल्यावर जाम एका कोरड्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवायचा.
हापूस आंब्याचा जाम
हापूस आंब्याच्या 3 ते 4 फोडी करून त्या मिक्सरमधून फिरवून त्याचा रस करायचा. गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये हा रस घालायचा. त्यामध्ये एक वाटी साखर, 1 ते 2 चमचे लिंबाचा रस आणि अर्धी वाटी पाणी घालून सगळे मध्यम आचेवर शिजवायचे. साधारणपणे 20 मिनीटे हे सगळे मिश्रण सतत ढवळत राहायचे म्हणजे हे चांगले शिजण्यास आणि एकजीव होण्यास मदत होते. पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि जाम घट्ट होईपर्यंत परतायचे. काही वेळाने या जामचा रंग बदलतो. शिजवल्यामुळे तो घट्ट झाला की, काढून एका बरणीत ठेवावा. हा जाम, ब्रेड, पोळी कशासोबतही अतिशय छान लागतो.



























































