होळी साजरी करण्याकरिता घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे बनवाल, त्वचाही राहिल सुरक्षित, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकमेकांमधील हेवेदावे, मनातील वाईट विचारांना दूर सारून आनंदाची उधळण करणारा ‘होळी’ हा सण आता अगदी जवळच येऊन ठेपलाय. या दिवशी रंग आणि गुलाल एकमेकांवर उडवून होळी खेळण्याची मजा काही औरच असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजेच धुलिवंदन साजरी करतात. नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि आपल्या प्रिय व्यक्तिंसोबत खेळले जाणारे हे रंग वर्षभर मनातले दु:ख दूर करायला मदत करतात. या सणादरम्यान बाजारात अनेक प्रकारचे रंग आणि गुलाल विकत मिळतात, मात्र त्यामध्ये रासायनिक पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्यामुळे ती त्वचेसाठी धोकादायक असतात. मौजमजेच्या या सणाला आपण आपल्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी घेणेही गरजेचे आहे. याकरिता घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीनेही विविध प्रकारचे रंग, गुलाल तयार करता येतात. जे आरोग्यासाठी हानिकारक नसतात. या रंगांच्या साहाय्यानेही तुम्ही होळीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

लाल गुलाल 

होळीकरिता लाल गुलाल एकमेकांच्या अंगावर उडवण्यासाठी सर्रास वापरला जातो. घरी हा गुलाल तयार करण्यासाठी 3 चमचे कुंकू, 1 चमचा चंदन पावडर आणि 5 चमचे मैदा घ्या. हे तीनही पदार्थ व्यवस्थित एकमेकांत मिसळले की, झाला ‘लाल गुलाल’ तयार. लाल गुलाल तयार करण्याकरिता बाजारातून विकत घेतलेले कुंकू शुद्ध आणि भेसळविरहित असणे आवश्यक आहे.

गुलाबी गुलाल

लाल गुलालाप्रमाणेच गुलाबी रंगाचा गुलालही होळी खेळण्यासाठी आवर्जून वापरतात. हा गुलाल घरी तयार करण्याकरिता बाजारातून बीटरूट आणा. बीटरूट धुवून किसा. किसलेले बीट उन्हात कडकडीत वाळवा. ते व्यवस्थित कोरडे झाल्यावर त्याची पावडर करा. त्यामध्ये 3 चमचे तांदळाचे पीठ घाला. याचे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळल्यावर झाला गुलाबी रंगाचा सेंद्रिय आणि नैसर्गिक गुलाल.

केसरिया गुलाल

3 चमचे शेंदूर घ्या. त्यामध्ये 1 चमचा चंदन पावडर आणि 5 चमचे डाळीचे पीठ (बेसन) घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळल्यावर होईल तयार होळीकरिता केशरी म्हणजेच केसरिया गुलाल. बाजारातून केशर सिंदूर खरेदी करू शकता किंवा हनुमानाला अर्पण केलेला ओला सिंदूरही यासाठी वापरू शकता.

हिरवा गुलाल

होळीकरिता हिरवा गुलाल तयार करण्यासाठी अन्नपदार्थाकरिता वापरला जाणारा (फूड ग्रेड) हिरवा रंग बाजारातून आणा. त्यामध्ये टॅल्कम पावडर मिसळा. हे प्रमाण 10 चमचे टॅल्कम पावडर आणि 1 चमचा फूड ग्रेड हिरवा रंग असे ठेवा. हे दोन्ही पदार्थ एकमेकांमध्ये मिसळे की, हिरवा गुलाल तयार होईल.

पिवळा गुलाल

होळीच्या रंग खेळण्याकरिता पिवळ्या रंगाचा वापरही जास्त प्रमाणात केला जातो. घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तो सहजरित्या तयार करता येईल. याकरिता 3 चमचे हळद पावडर, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा चंदन पावडर घ्या. हे तीनही पदार्थ व्यवस्थित एकत्रित केल्यास पिवळा सेंद्रिय गुलाल तयार होईल.