
सामना ऑनलाईन । मुंबई
घटस्फोट होऊन दोन वर्ष उलटली पण कधीही सुझान आणि हृतिक एकमेकांपासून विभक्त झाले असे त्यांच्या चाहत्यांना वाटलेच नाही. मुलांचा वाढदिवस असो किंवा घरातल्या पार्ट्या असो, डिनर डेट, न्यू ईयर पिकनीक असे सगळीकडेच हे दोघे एकमेकांसोबत दिसतात. त्यामुळे सुझान आणि हृतिकचं नक्की चाललंय तरी काय असा प्रश्नच त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण गोंधळलेल्या या चाहत्यांना हे दोघेही एक गोड बातमी द्यायच्या तयारीत आहेत.
सुझान आणि हृतिक या दोघांत पुन्हा प्रेमाची पालवी फुटली असून ते पुन्हा एकदा लग्न करण्याच्या विचारात आहेत. सुझान आणि हृतिक गेले काही दिवस बराच वेळ एकमेकांसोबत घालवत आहेत. त्यांनी एकमेकांना अधिकाधिक वेळ देऊन त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांची देखील हीच इच्छा आहे. त्यामुळे ते पुन्हा लग्न करणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. नवीन वर्षा निमित्त सुझान आणि हृतिक मुलांसोबत स्वित्झरलॅण्डला फिरायला गेले होते, तेथेच ते एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे बोलले जातेय.
सुझानने नुकतेच हृतिकच्या वाढदिवसाला देखील त्यांचा एक सुंदर फोटो शेअर करून त्याला प्रेमळ शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात तिने हृतिकला तिच्या आयुष्याला प्रकाशित करणारे सुर्यकिरण अशी उपमा दिली होती. याआधी देखील सुझानने अनेकदा हृतिक व कंगना वादात सोशल मीडियावरून हृतिकची बाजू घेतली आहे. तर सुझान आणि अर्जुन रामपाल यांच्यातील अफेयरमुळे तिचा हृतिकसोबत घटस्फोट झाल्याच्या अफवा उठल्या होत्या तेव्हा हृतिकने सुझानची बाजू घेतली होती. त्यामुळे घटस्फोटानंतरही ते दोघे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कायम दिसून आलेय.
























































