बारावीच्या 30 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नाही, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दिल्याने राज्यभरात बारावीच्या सुमारे 30 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. उत्तरपत्रिका वेळीच तपासल्या गेल्या नाहीत तर निकालही वेळेत लावणे कठीण होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची आपल्या विविध मागण्यांबाबत 20 फेब्रुवारी रोजी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठक झाली होती. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन त्या बैठकीत मिळाल्यानंतर शिक्षकांनी बारावी परीक्षेवरील असहकार आंदोलन मागे घेतले होते. त्यामुळे बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीत सुरू आहेत. परंतु मागण्यांबाबत शासन आदेश निघेपर्यंत तसेच वित्त विभागाशी संबंधित मागण्यांवर निर्णय होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम राहील असा इशारा महासंघाने दिला होता.

बारावीचे इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू या विषयांचे पेपर झाले आहेत. परंतु या विषयांच्या मुख्यनियामक व नियामकांच्या (चीफ मॉडरेटर व मॉडरेटर) बैठका झाल्या नाहीत. असहकार आंदोलन सुरू असेपर्यंत बैठक घेणार नाही असे त्यांनी शिक्षण मंडळाला कळवले आहे. त्यामुळे राज्यभरात सुमारे 30 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असून बारावीचा प्रत्येक पेपर झाल्यावर त्यात 15 लाखांची भर पडणार आहे.

वित्त मंत्र्यांबरोबर 26 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात संयुक्त बैठक बोलावली आहे. त्यावेळी सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यामुळे बारावीचा निकाल लांबून विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 जूनपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे.

शिवाजी पार्कचे डम्पिंग ग्राऊंड!
भारिप-बहुजन महासंघाची सभा शनिवारी शिवाजी पार्क येथे झाली. यावेळी ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शक्तिप्रदर्शन केले. मात्र, त्यांच्या हजारो समर्थकांनी आणलेले कागद, बाटल्या, पुठ्ठे यामुळे शिवाजी पार्कचा चेहरामोहराच बदलून गेला. जागोजागी साठलेल्या कचऱयामुळे खेळाच्या मैदानाचे रूपांतर डम्पिंग ग्राऊंडमध्ये झाले.