…आणि गांधी युगाचा आरंभ झाला!

797

>> दिलीप जोशी ([email protected])

सन 1912. हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळीतील नेमस्त विचारांचे पुढारी नामदार गोपाळ कृष्ण गोखले इंग्लंड दौऱ्यानंतर गांधीजींच्या आमंत्रणावरून दक्षिण आफ्रिकेला पोहोचले. जोहान्सबर्ग येथे गांधींनी आपले राजकीय गुरू गोखले यांचे भव्य स्वागत केले. या शहरापासून पाच मैलावर असलेल्या एका टेकडीवरच्या सुंदर बंगल्यात गोखले यांची राहण्याची व्यवस्था झाली. केपटाऊनपासून अनेक ठिकाणी गोखले यांच्या सभा आयोजित करण्याचं काम गांधीजी आणि त्यांचे सहकारी आत्मीयतेने करीत होते.

नामदार गोखले यांचं इंग्लिश भाषेवर प्रभुत्व होतं. त्यांचं भाषण ऐकायला इंग्लंडमधील प्रसिद्ध व्यक्तीही येत असत. आफ्रिकेत याच भाषेत बोलावं लागणार हे गोखले यांना ठाऊक होतं. मात्र जोहान्सबर्गला मराठी मंडळीही बरीच असल्याने गोखले यांनी मराठीच बोलावं असा हट्ट गांधीजींनी धरला. ‘दक्षिण आफ्रिकाना सत्याग्रहना इतिहास’ या पुस्तकात स्वतः गांधीजी लिहितात, ‘जोहान्सबर्गच्या हिंदुस्थानी लोकांच्या सभेत मातृभाषेत किंवा हिंदीतच बोलावं असा माझा आग्रह होता. परंतु मोडक्यातोडक्या हिंदीत बोलणं गोखले यांना आवडलं नसतं. मग इंग्लिशमध्येच का नाही? पण तिथे बरीच मराठी माणसं होती आणि त्यांना गोखले यांचं मराठीतलं भाषण ऐकायला आवडलं असतं त्यांनी ‘गोखले यांना मराठीत बोलायला सांगा’ अशी विनंती मला केली. मी गोखले यांना म्हटलं ‘तुम्ही मराठीत बोलाल तर उत्तम. त्याचं रुपांतर मी हिंदीमध्ये करीन.’ यावर गोखले गडगडाटी हसत म्हणाले, ‘तुझं हिंदीचं ज्ञान मला चांगलंच ठाऊक आहे. ते तुझं तुलाच लखलाभ आणि आता तू मराठी भाषणाचं रूपांतर करणार म्हणतोस, पण एवढं मराठी कुठे शिकलास ते सांग.’ मी म्हणालो ‘माझ्या हिंदीच्या ज्ञानाइतकंच मराठीचं ज्ञान आहे असं समजा. मी मराठीत बोलू शकणार नाही. परंतु तुम्ही बोलाल त्याचा भावार्थ नक्की समजेल आणि लोकांपर्यंत विपरीत संदेश जाणार नाही एवढं नक्की आणि इतर कोणीतरी रुपांतर करणं तुम्हाला पटणारं नसल्याने मलाच ते काम करावं लागणार. यावर गोखले हसून उद्गारले, ‘तू तुझा हट्ट पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीस. इथे तुझ्याकडे आलोय तेव्हा मला ऐकावंच लागेल.’ पुढे गांधीजी लिहितात, ‘त्यानंतर केवळ माझ्या शब्दाखातर गोखले यांनी अगदी झांजीबारपर्यंत अनेक ठिकाणी मराठीतूनच भाषणं केली. स्थानिक मराठीजनांवर त्याचा प्रभाव पडतोय हे त्यांच्याही लक्षात आलं.’

गांधीजी आणि गाखले यांचं नातं असं होतं. आफ्रिकेतील त्यावेळच्या हिंदी लोकांना नाडणाऱ्या ‘काळय़ा कायद्या’विरुद्ध चाललेला गांधीजींचा सत्याग्रह जगाला ठाऊक झाला होता. रशियन तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय आणि गांधीजींचा 1910 मध्ये पत्रव्यवहार झाला होता. विरोधाच्या या अनोख्या संकल्पनेबद्दल जगाला उत्सुकता होती. गोखले यांनी तिथल्या वर्णद्वेषी गोऱ्या सरकारशी चर्चा करून काळा कायदा रद्द करण्याचं वचन घेतलं आणि आफ्रिका सोडताना ते गांधींना म्हणाले, ‘आता काळा कायदा आणि तीन पाऊंडचा कर लवकरच रद्द होईल आणि तू वर्षभरात हिंदुस्थानात परतलं पाहिजे. त्याबाबत आता एकही बहाणा चालणार नाही.’

मात्र दक्षिण आफ्रिकेतील सरकारने वचनभंग केला. गांधी लगेच हिंदुस्थानात परत येऊ शकले नाहीत. ते 1915 मध्ये जानेवारी महिन्यात मुंबईला आले. तिथे त्यांच्या स्वागत सभेला लोकमान्य टिळक पुण्याहून खास आले होते. नंतर पुण्याला जाऊन गांधींनी गोखल्यांची भेट घेतली. तत्पूर्वी ते लोकमान्यांना आणि फिरोजशहा मेहता यांना भेटले होते. गांधीजींनी म्हटलंय, ‘लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्त्व महासागरासारखं होतं, तर फिरोजशहा हिमालयासारखे उत्तुंग. तिथपर्यंत पोहोचणं माझ्यासारख्या सामान्याला शक्य नव्हतं. गोखले यांच्या भेटीनंतर गंगास्नान केल्यासारखं वाटलं. ते मला जमणारं होतं.’

गोखले यांच्याशी झालेल्या भेटीत गोखले यांनी गांधीजींना रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाने वर्षभर हिंदुस्थान भ्रमण करून देश जाणून घेण्याची सूचना केली. गांधींनी गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानला. त्यानंतर गांधीजी शांतीनिकेतनमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना भेटायला गेले असताना त्यांना गोखले यांचं अकाली निधन झाल्याची दुर्वार्ता समजली. ते हिंदुस्थानात परतल्यावर महिन्याभरातच त्यांची गुरुकृपा निमाली होती. गांधीजींना विलक्षण दुःख झालं. आता त्यांचे नेमस्त पथाचं कार्य पुढे नेण्याची जबाबदारी गांधीजींवर आली होती.

थोडय़ाच दिवसांत लोकमान्य चिरोल खटल्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले. तिथून ते परतल्यावर त्यांना गांधींच्या चंपारण्यातील सत्याग्रहाविषयी समजलं. याच सुमारास अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाची साद्यंत माहिती देणारं पुस्तक लिहिलं आणि लोकमान्यांनी त्याला प्रस्तावना लिहिताना गांधीजींचं कौतुक केलं होतं. ही गोष्ट 1918 मधली. हिंदुस्थानच्या इंग्रजी वसाहतीच्या काळात देशात अत्यंत लोकप्रिय नेता असलेल्या लोकमान्यांचे आणि गोखले यांचे शिष्य असलेल्या गांधींचे सगळेच विचार जुळणारे नव्हते. तरीही लोकमान्यांनी गांधींचं कर्तृत्व जाणलं. राजकीय सहिष्णुतेचा तो परिपाठ होता. गांधीजींनीही देशातली करोडे तरुणांना आदरस्थानी असलेल्या लोकमान्यांविषयी आदर होताच. ते त्यांचा उल्लेख ‘तिलक महाराज’ असा करीत. 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत लोकमान्यांचं निधन झालं. गांधी त्यांना अखेरचा निरोप देताना हजर होते. आणि हिंदुस्थानी राजकारणातलं ‘लोकमान्य युग’ संपून ‘महात्मा’ युग सुरू झालं होतं. उद्या महात्मा गांधी यांची 150वी जयंती. त्यानिमित्त इतिहासाच्या पानांमधल्या या महत्त्वाच्या गोष्टी आठवल्या त्या मांडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या