Ayodhya Ram Temple – तुफान गर्दीमुळे दर्शन तात्पुरते बंद करण्याचा निर्णय

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिराचे उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमानंतर रामाचे दर्शन घेण्यासाठी जबरदस्ती गर्दी उसळली असून, या गर्दीमुळे दर्शन तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. रामाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तांचे लोंढे सातत्याने येत असून या भक्तांच्या गर्दीमुळे राम मंदिराच्या परिसरात तुफान गर्दी उसळली आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून या रांगा संपतच नाहीये. दर्शनासाठी विलंब होत असल्याने आणि नीट माहिती मिळत नसल्याने भक्त संतापले आहेत. मंदिर प्रशासनाला गर्दी आवरत नसल्याचे दिसून आले आहे.

प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर मंगळवारी अडीच ते तीन लाख भक्तांनी दर्शन घेतले असून तेवढेच भक्त रांगेत उभे आहेत. इथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले असून 8 हजारांपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहे. भक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळल्याने गृहसचिव संजय प्रसाद आणि पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार हे स्वत: मंदिराच्या गर्भगृहात हजर असून ते जातीने लक्ष ठेवून आहेत. भक्तांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे मात्र अभूतपूर्व गर्दीमुळे इथल्या सुविधा कोलमडून पडण्याची भीती आहे.

भक्तांना बाराबंकी इथे अडवले

भक्तांची प्रचंड गर्दी पाहता बाराबंकी पोलिसांनी भक्तांनी पुढे जाऊ नये असे आवाहन केले आहे. अयोध्या ते बाराबंकी हे अंतर सुमारे 100 किलोमीटर आहे. पोलिसांनी भक्तांना बाराबंकीमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला आहे. अयोध्येत भक्तांची मोठी गर्दी असल्याने वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येत भाविकांच्या अनेक किलोमीटर लांब गर्दीमुळे राम लल्लाचे दर्शन थांबवले नसल्याचे स्पष्टीकरण अयोध्या पोलिसांनी दिले आहे.