बंद करा, बंद करा, लक्ष्मी ऑर्गानिक बंद करा! कोकणवासियांचा विराट मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणचा निसर्ग आमचा श्वास, बंद करा पीफास कारखाना, आमचा जीव मोठा, कारखाना बंद नाहीतर आंदोलन तीव्र, अशी घोषणांनी परिसर दणणला होता. लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़मधील पीफास हे घातक उत्पादन बंद झालेच पाहिजे, या मागणीसाठी लक्ष्मी ऑर्गेनिकच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संघर्ष समिती, जन आक्रोश समिती यांनी एकत्र येऊन प्रशासनाला आणि सरकारला जाग आणण्यासाठी सोमवारी हा मोर्चा काढला.

इटलीमधील मिटेनी कंपनीमध्ये पीफास या रसायनाची निर्मिती केली जात होती. मात्र, त्या प्रक्रियेच्या दरम्यान तयार होणारे टाकाऊ रासायनिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीतील पाणी दूषित होते. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर असले विष आमच्या निसर्गरम्य कोकणात आणून इथले मानवी जीवन आणि कोकणचा निसर्ग उद्ध्वस्त करण्यामागे सरकारचा हेतू काय? असा संतप्त सवाल आंदोलनात व्यक्त केला गेला.

मनसेचा सहभाग
या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आणि मनसेने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. परिणामी मनसे सोबतच आणखीही काही संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आणि मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले.

या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खात्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर मोर्चेकर्‍यांना कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून पाचशे मीटर अंतरावरच मोर्चा थांबवण्याचे आदेश दिले होते. हा मोर्चा मुंबई गोवा महामार्गावरील एक्सल फाटा येथून निघाला आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या जागेपर्यंत पोहोचला. मोर्चामध्ये सहभागी झालेले महिला आणि पुरुष आंदोलकांनी जोरदार घोषणा देऊन कारखान्याचा तसेच या कारखान्याला परवानगी देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला.

आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देतो आणि ते आमच्या जीवनाचा आणि निसर्गाचा लिलाव करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. पीफास रसायनाच्या निर्मितीमधून किंवा प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रदूषण अथवा जीवितहानी झाली तर त्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ इतकेच काय तर सरकारकडे सुद्धा कायदा अस्तित्वात नाही. मग असे असताना भविष्यात काही दुर्घटना घडली तर या कारखान्यावर कारवाई करणे शक्य होईल का? असा सवाल आंदोलन कर्ते विचारत आहेत. मग हा कारखाना कोणाच्या फायद्यासाठी आणि आशीर्वादाने आमच्या कोकण वासीयांच्या माथी मारला जात आहे? असाही सवाल उपस्थित करत ‘जोपर्यंत असा कायदा तयार होत नाही तोपर्यंत हा कारखाना बंद राहिला पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत’ असे आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितले. आताही शासन आणि सरकारने जर दखल घेतली नाही तर आमचे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे होईल असा इशाराही दिला.

यावेळी धरणे आंदोलनाला बसलेले अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, उदय घाग, कांचन चाळके, रवींद्र गोवळकर, अविनाश आंबे, दिलीप घाग, सचिन चाळके, संजय चाळके, पं.स. सदस्य अजय चाळके, मनसे दक्षिण रत्नागिरी संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह इतरही अनेक संघटना आणि शेकडो कोकणवासीय महिला आणि पुरुष आंदोलन उपस्थित होते.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष
तीन महिने चालू असलेल्या लक्ष्मी ऑर्गानिक विरोधातील आंदोलनाकडे प्रशासन किंवा कोणीही स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसून कोकणी जनतेच्या जीवाशी खेळ करत आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदन प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार यांच्याकडे दिले आणि मोर्चाची सांगता झाली.