स्पर्धा महोत्सव : विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात

235

वेगवेगळे रंग भरलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या आणि त्या काढणार्‍या हसर्‍या मुलामुलींचे चेहरे… उपविभागप्रमुख व जागृती मंचचे अध्यक्ष राम साळगावकर यांच्यातर्फे शिवसेना वरळी विधानसभेच्या सहकार्याने ‘स्पर्धा महोत्सव’ लोअर परळच्या ना. म. जोशी शाळेत भरवण्यात आला आहे. शनिवार दि. 15 डिसेंबरपासून सुरू झालेला हा महोत्सव थेट नव्या वर्षात 6 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर, कल्याण, उरण, अलिबाग येथील 4 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी आहेत. आधी केवळ दोन ते तीन स्पर्धांनीच सुरू झालेल्या या महोत्सवात आता पाककला, रांगोळी  स्पर्धा व प्रदर्शन, चित्रकला, एकपात्री अभिनय, मेंदी, ब्रास बॅण्ड महोत्सव अशा आणखीही अनेक स्पर्धा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दै. ‘सामना’ हे या स्पर्धा महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहेत.

या स्पर्धा महोत्सवात प्रवेश विनामूल्य असून यात भाग घेणार्‍या विजेत्या स्पर्धकांना भरघोस पारितोषिके व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अमृत भवनजवळ, शिवाजी नगर, डिलाईल रोड, लोअर परळ (पूर्व) येथे ही स्पर्धा शनिवारी 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू झाली. त्यानंतर रविवारी 16 डिसेंबरला एकपात्री अभिनय स्पर्धा पार पडली. त्यानंतर शुक्रवारी 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते रविवार 23 डिसेंबर सकाळी 11 पर्यंत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पुढील सातही दिवस या रांगोळ्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी 23 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता चित्रकला स्पर्धा  पार पडली. लोअर परळच्या श्रमिक जिमखाना येथे ही स्पर्धा भरवण्यात आली. चित्रकला स्पर्धेत असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता त्याच ठिकाणी बॅण्ड महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी 25 डिसेंबरला दुपारी 4.30 वाजता लोअर परळच्या श्रमिक जिमखाना येथे मेंदी रंगवणे स्पर्धा झाली, तर लोअर परळच्या ना. म. जोशी मार्ग शाळेत रविवारी 6 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता पाककला स्पर्धा पार पडली, अशी माहिती जागृती मंचचे अध्यक्ष आणि शिवसेना उपविभागप्रमुख राम साळगावकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या