मानव-बिबटय़ा संघर्ष

leopard

>> राजेश चुरी

सध्या महाराष्ट्रात बिबटे आणि माणसांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मागील दोन वर्षांत 284 बिबटय़ांचा तर बिबटय़ांच्या हल्ल्यात 35 माणसांचा मृत्यू झाला. भविष्यात वाढत जाणाऱया या संघर्षावर राज्याच्या वन विभागाने शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला आहे. त्यानिमित्ताने बिबटे आणि मानवाच्या संघर्षाचा घेतलेला आढावा…

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या शेजारील वसाहतीतील बिबटय़ा घुसला…नगरमध्ये बिबटय़ाचा शेतकऱयावर हल्ला….रत्नागिरीत बिबटय़ाने कोंबडय़ांचा फडशा पाडला…नाशिकमध्ये नागरी वसाहतीत घुसलेल्या बिबटय़ाचा मृत्यू… ट्रकच्या धडकेत बिबटा मृत्युमुखी.. गेल्या काही वर्षांत वर्तमानपत्रात सतत अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. प्रत्येक वेळेस नागरी वसाहतीमध्ये घुसलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वन खात्याची टीम जाते आणि मग बघ्यांचीही गर्दी उसळते. हलकल्लोळ माजतो. बिबटय़ा बिथरतो आणि मग कधी तरी बिबटय़ाचा दुर्दैवी मृत्यू होतो. अत्यंत चपळ आणि उमद्या अशा या जनावराचा मृत्यू पाहणे हे वन्यप्रेमींसाठी अतिशय दुर्दैवी घटना असते. वास्तविक बिबटय़ांच्या संख्येत संपूर्ण देशात महाराष्ट्र तिसऱया क्रमांकावर आहे. बिबटय़ांची प्रजोत्पादन क्षमता मोठी आहे आणि आपण लोकांनी जंगलावरच अतिक्रमण सुरू केल्यामुळे बिबटे नागरी वस्तीमध्ये घुसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून मानव व बिबटय़ामधील संघर्ष वाढत चालला आहे. भविष्यात हा संघर्ष वाढण्याचीच शक्यता आहे. त्याचबरोबर बिबटय़ांची मृत्यूची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे या सर्व कारणांचा शास्त्र्ाशुद्ध अभ्यास करण्यासाठी एक तांत्रिक अभ्यास समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानंतर वन खात्याने त्वरीत अकरा तज्ञांची तांत्रिक अभ्यास समिती नेमली आहे. पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करील.

पण केवळ अहवाल सादर करून चालणार नाही. सरकारी पातळीवर अशा अनेक समित्या स्थापन होतात. त्यांचे अहवालही सरकारला सादर होतात, पण पुढे फार काही होत नाही. निदान याबाबतीत तरी होऊ नये. कारण यत्र व्याघ्रः तत्र अरण्य निरायम – असे म्हटले जाते. त्यामुळे वनांबरोबर वन्य प्राण्यांची संख्याही वाढणे गरजेचे आहे. अभ्यासानुसार देशात चार प्रकारचे बिबटे आढळून येतात. यात पश्चिम घाटांचा बिबटय़ा, डेक्कन पठार अर्ध-शुष्क प्रदेशमधील बिबटय़ा, शिवालिक पर्वत आणि उत्तर हिंदुस्थानातील तराई क्षेत्रातील बिबटय़ांचा समावेश आहे.

बिबटय़ांमध्ये 60 टक्के वाढ

राज्यात वाघांची संख्या वाढत असताना दुसरीकडे बिबटय़ांची संख्याही वाढत आहे. केंद्र सरकारकडून नुकताच बिबटय़ांचा गणनेचा 2018 चा अहवाल अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार देशातील बिबटय़ांची संख्या 12 हजार 852 असल्याचे आढळून आले आहे. 2014 ची तुलना करता ही संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालानुसार मध्य प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावर असून त्या राज्यात 3 हजार 421 बिबटय़ांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 1 हजार 783 बिबटे असून त्यानंतर तिसऱया क्रमांकावर महाराष्ट्र राज्य असून राज्यात 1 हजार 690 बिबटय़ांची नोंद झाली आहे.

असा सुरू होतो संघर्ष

बिबटय़ाचा नैसर्गिक स्वभाव, त्याची वर्तणूक, बदलणाऱया परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व मोठय़ा प्रमाणावर प्रजोत्पादन क्षमता यामुळे बिबटय़ांच्या संख्येत वाढ झाली आहे. बिबटय़ाची एक मादी एका वेळेस सरासरी चार पिलांना जन्म देते व पिले जगण्याचे प्रमाणही अधिक झाले आहे. त्यातून बिबटय़ांच्या संख्येत भरमसाट वाढ होत आहे तर दुसरीकडे वन क्षेत्रातील अतिक्रमणे, तृणभक्षी प्राण्यांची संख्याही कमी होत आहे. त्या उलट उसासारखे क्षेत्र आणि डुकरे, पुत्रे व पाळीव प्राणी यांची उपलब्धता यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे आपृष्ट झाले आणि त्यांनी आपला अधिवास हा या शेतीमध्ये प्रस्थापित केल्याने मानव-बिबटय़ा हा संघर्ष सुरू झाला.

मागील दहा वर्षांपासून या संघर्षामध्ये वाढ झाली आहे. तसेच बिबटय़ांची 2014 ते 2018 या कालावधीत 60 टक्के वाढ झाली. साहजिकच संख्या वाढल्याने मानव-बिबटय़ा संघर्ष वाढीस लागला. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ झाल्यामुळे बिबटय़ा हा लोकवस्तीकडे आकृष्ट झाला.

बिबटय़ांचा वावर मानवी वस्तीत

मागील काही वर्षांत सिंचनाखाली व विशेषतः उसाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे बिबटय़ास अधिवासासाठी मुबलक क्षेत्र उपलब्ध झाले आहे. तसेच वन्य क्षेत्रात उजाड माळराने तसेच तृणभक्षी प्राण्यांची घटत जाणारी संख्या यामुळे खाद्य शोधण्यासाठी बिबटय़ांनी शेतीत प्रवेश केला व ते या क्षेत्रात स्थिरावले आहेत. बिबटय़ाचा मानवी वस्तीत शिरकाव झाल्याने मानव व बिबटय़ा संघर्ष वाढत आहे. लोकांमध्ये त्यामुळे एक अनामिक भीती तयार होऊन हा संघर्ष अधिक तीव्र होतो. बिबटय़ा मानवी वस्तीत घुसल्यानंतर वन विभागाच्या बचाव पथकामार्फत असा बिबटय़ाचे ‘रेस्क्यू’ अभियान करून त्याला जेरबंद केले जाते. मागील दोन वर्षांत 124 बिबटय़ांना रेस्क्यू करण्यात आले आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तसेच भुलीच्या इंजेक्शनचा वापर केला जातो.

बिबटय़ा-मानव संघर्ष हा सिंचनाच्या सोयी असलेल्या कोल्हापूर, नगर , नाशिक, पुणे, संभाजीनगर व धुळे या जिह्यांत दिसून येतो. या संघर्षात माणसांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. राज्यात 2019 मध्ये बिबटय़ाच्या हल्यात आठ व्यक्तींचा मृत्यू झाला तर 2020 मध्ये 27 व्यक्तींना बिबटय़ांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले.

बिबटय़ांचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात 2019 मध्ये 110 बिबटय़ांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला, तर 2020 मध्ये 172 बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. बिबटय़ांचे सर्वात जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. म्हणजे जंगल, घाट व गावातील रस्ता पार करताना वाहनाच्या धडकेत बिबटे अधिक संख्येने मृत्युमुखी पडतात. त्यानंतर विहिरीत पडून, रेल्वे अपघात, शिकार, विजेचा शॉक आणि विषबाधा यामुळे बिबटय़ांचे मृत्यू होतात.

पुन्हा नैसर्गिक अधिवासात

एकदा बिबटय़ा पकडला की त्याला तात्पुरते प्राणी उपचार केंद्रात ठेवतात. अशी तात्पुरती प्राणी उपचार केंद्रे ही बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, जुन्नरमधील बिबटय़ा निवारण केंद्र, बावधनमधील तात्पुरते उपचार केंद्र बावधन तसेच नागपूरच्या गोरेवाडा येथील तात्पुरते प्राणी उपचारात केंद्रात ठेवतात. या ठिकाणी योग्य व प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱयांमार्फत उपचार करून बिबटय़ांना परत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.

बिबटय़ांच्या संघर्षात महाराष्ट्र आघाडीवर

गेल्या काही वर्षांत मानवी वस्त्यांजवळ बिबटय़ांचा वावर वाढला आहे. कारण बिबटय़ाच्या मानवी अधिवासात वावरण्याची सहज प्रवृत्ती व कोणत्याही नैसर्गिक परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता यामुळे बिबटय़ांनी मागील काही वर्षांत मानवी प्रदेशात मुक्त संचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून बिबटे व मानव संघर्ष वाढीस लागण्याच्या घटनात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. या संघर्षात महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर असून नुकताच एका नरभक्षक बिबटय़ाने संभाजीनगर, नगर , बीड व सोलापूर या जिह्यांत धुमापूळ घालून जवळपास 11 लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे बिबटय़ा व मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या