मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यात मानद वन्यजीव रक्षकांची भूमिका मोलाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्त्वाचा दुवा आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून त्यांचे सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करून हा संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना राज्य सरकाराला सुचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

निसर्गस्नेही मुख्यमंत्री लाभला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांशी व्हीसीद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांशी संवाद साधणारे हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची तसेच राज्याला निसर्गस्नेही मुख्यमंत्री लाभल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया मानद वन्यजीव रक्षकांनी दिली. त्यांनी राज्यात हेरिटेज ट्री संकल्पना राबवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

वन, वन्यजीव आणि पर्यावरणावरील प्रेम ही मानद वन्यजीव रक्षकांची खरी ओळख आहे. त्यांना त्यांच्या भागात कुठे जंगल आहे, कुठे कोणते वन्यजीव आहेत हे माहीत असते. त्यामुळे विकासकामे कुठे व्हावीत आणि कुठे होऊ नयेत याचेही उत्तम मार्गदर्शन ते करू शकतात अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

प्रादेशिक वैशिष्टय़े जपण्याची गरज

जंगलांवर उपजीविका अवलंबून असलेले लोक, बफर क्षेत्रात वस्ती करून राहत असलेले लोक त्यांच्या गरजांसाठी जंगलात जातात आणि त्यांच्यावर वन्यजीवांचे हल्ले होतात. त्यामुळे या नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा समन्वय साधून उपजीविकेसह इतर सुविधा त्यांच्या राहत्या ठिकाणी कशा उपलब्ध होतील याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. निसर्गात वाघ, बिबटय़ांप्रमाणेच अन्य पशुपक्षी-फुलपाखरे आणि इतर वन्यजीवही महत्त्वाचे असतात. त्यांची स्थानिक वैशिष्टय़ेही असतात. या प्रादेशिक वैशिष्टय़ांसह हा निसर्ग जपण्याची आवश्यकता आहे त्यादृष्टीनेही विचार करावा, मानद वन्यजीव रक्षकांनी यासंबंधीच्या सूचना विभागाला द्याव्यात, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. नितीन काकोडकर, वन विभागाचे अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक आणि इतर उपस्थित होते.

प्रादेशिक झाडे लावणार

नामशेष होत जाणाऱया प्रजातींचे संरक्षण करून त्यांचे संवर्धन करणे, नवीन प्रजातींचा शोध या सगळ्याच गोष्टी पर्यावरणात महत्त्वाच्या आहेत. या वर्षी वृक्षारोपण करताना पशुपक्ष्यांची अन्नसाखळी मजबूत करणाऱया आणि स्थानिक वातावरणात रुजणाऱया आणि फुलणाऱया वृक्षांची बीजे ड्रोनच्या सहाय्याने डोंगरमाथ्यांवर तसेच माणसांचा कमी वावर असलेल्या ठिकाणी टाकण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.