माणुसकी हीच जात, सेवा हाच धर्म! रुग्णांसाठी अहोरात्र अ‍ॅम्ब्युलन्स हाकताहेत मुराद खान

1177

मुंबईसह देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना रुग्णांच्या सेवेसाठी धावून जाणार्‍यालाच सध्या ‘देव’ मानले जात आहे. अशीच रुग्णसेवा अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून कांदिवली येथील मुराद अली खान अहोरात्र करीत आहेत. ‘माणुसकी हीच जात, सेवा हाच धर्म! मी जात-धर्म मानत नाही. रुग्णांची सेवा हेच परमकतर्व्य समजतो’ असे ते सांगतात.

कांदिवली पठाणवाडी येथे राहणारे 50 वर्षीय मुराद अली खान यांना पहिल्यापासूनच जनसेवेची आवड आहे. हिंदू, मुस्लीम, शीख हे सर्व धर्मीय एकच असल्याचे ते सांगतात. गेल्या वर्षीपासून या अ‍ॅम्ब्युलन्सवर ड्रायव्हर म्हणून काम करणार्‍या मुराद यांनी वर्षभरात 600 हून जास्त गरजू रुग्णांना सेवा दिली आहे. यामध्ये त्यांनी मुंबईसह हैदराबाद, बंगळुरू, हॉटेस्ट, कर्नाटक, गोरखपूर सातारा या ठिकाणी रुग्णांना सेवा दिली आहे. गेल्या वर्षी कोल्हापूरच्या महापुरात शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्यासोबत तब्बल आठ दिवस मदतकार्य केले. तर कोरोनाचा प्रभाव वाढल्यापासून मुंबईच्या विविध भागात 150 हून जास्त गरजू रुग्णांना सेवा दिली आहे. शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गरजूंना सुविधा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेमुळेच मिळाली संधी!
मुंबईत गरजू रुग्णांना रुग्णवाहिका सुविधा मिळावी यासाठी शिवसेना विभाग 2२ च्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या सहकार्याने आणि विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या वतीने ही रुग्णवाहिकेची सुविधा दिली जात आहे. यासाठी शाखाप्रमुख सुभाष डहाणुका यांचेही सहकार्य मिळत आहे. शिवसेनेमुळेच आपल्याला ही जनसेवा करण्याची संधी मिळाल्याचे मुराद खान यांनी सांगितले.

…तेव्हा मात्र डोळ्यात अश्रू येतात!
कोरोनामुळे सध्या रुग्णालयात डॉक्टर-आयोग्य सेवकच काय तर नातेवाईकही रुग्णापासून दूर राहतात. अशा वेळी रुग्णाला दुसर्‍या ठिकाणी न्यायचे असल्यास गैरसोय होते. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला तर काही वेळा कुटुंबातील व्यक्तीही फिरकत नाहीत. अशा वेळी डोळ्यांत अश्रू येतात! अशी भावना मुराद यांनी व्यक्त केली. मात्र आपण आवश्यक काळजी घेऊन स्वत: पुढाकार घेतो, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक पेशंटनंतर गाडी सॅनेटाइझ करणे, स्वत:ची स्वच्छता आणि काळजी घेतो असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या