गोंदियात बिबट्याची गोळ्या झाडून हत्या; पंजे छाटून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

गोंदिया जिह्याच्या गोठनगाव वनपरिक्षेत्रातील केळवद शिवारात बिबट्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून त्याचे चारही पंजे छाटून नेल्याची खळबळजनक घटना घडली. मृतावस्थेत मात्र या बिबट्याचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत. सापडलेला बिबट्या मादी असून बंदुकीने बिबट्याची शिकार करण्याची जिह्यातील पहिलीच घटना मानली जाते.

आजतागायत इलेक्ट्रिक शॉक व जाळे लावून बिबट्याची हत्या करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, मात्र गोळ्या घालून हत्या झाल्याचे प्रकार घडले नाहीत. बिबट्याच्या शरीरातून आरपार गोळी निघाली त्यामुळे अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या असाव्यात असा तर्क लावला जात आहे. रविवारी सकाळी गोंदिया वनविभागाचा पिटर नामक श्वान येथे आणण्यात आला. त्याच्या मदतीने वनविभागाचे शोधकार्य सुरू आहे.