वाढीव पाणीपट्टीवरून शिवसैनिक आक्रमक, हुपरीत नगर परिषद कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरमधील हुपरी नगर परिषदेने विशेष पाणीपट्टी दरात केलेल्या दरवाढीवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज आक्रमक पवित्रा घेत नगर परिषद कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. वाढीव पाणीपट्टी रद्द करा, अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी शहरप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रश्नांचा भडिमार करत शिवसैनिकांनी मुख्याधिकारी कुंभार यांना चांगलेच धारेवर धरले.

हुपरी नगर परिषदेने केलेली प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी, यासाठी शिवसेनेकडून वारंवार निवेदने व हरकती देऊनही दरवाढीचा निर्णय प्रशासनाकडून मागे घेण्यात आला नाही. ही पाणीपट्टीवरील दरवाढ ही जिझिया स्वरूपाची असून ती रद्द केली जावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. दरवाढीबाबत मुख्याधिकारी आणि अधिकाऱयांनी हरकतींवर कोणतीही सुनावणी अथवा म्हणणे न ऐकता ही दरवाढ केली. ही दरवाढ मागे घेण्याबाबत वारंवार निवेदने आणि इशारा दिल्यानंतरही नगर परिषदेचे प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे शिवसेनेने आज आंदोलन करत मुख्याधिकारी कार्यालयावर धडक देत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपतालुकाप्रमुख विजय जाधव, विभागप्रमुख विनायक विभुते, युवासेना शहराधिकरी भरत देसाई, माजी शहरप्रमुख रघुनाथ नलवडे, नगरसेवक बाळासो मुधाळे, नगरसेविका पूनम पाटील, संजय वाईंगडे, महिला आघाडी संघटक मीना जाधव, गीता रेंदाळे, उपशहरप्रमुख भरत मेथे, अरुण गायकवाड, शिवाजी जाधव, संदीप भंडारे, अक्षय चाणक्य, अजित मंडलिक, संताजी देसाई, अकबर फरास यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.