IPL 2025 दरम्यान तिकिटांचा काळाबाजार; हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना अटक, SRH शी कनेक्शन

इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात तिकिटांचा काळाबाजार केल्या प्रकरणी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांच्यासह अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणा सीआयडीने बुधवारी ही धडक कारवाई केली. यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

आयपीएल 2025 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांवर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरीवर सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप लगावला होता. यानंतर सीआयडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांच्यासह एचसीएच्या अधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर, तिकिटांचा काळाबाजार आणि प्रशासनातील त्रुटींबद्दल एफआयआर दाखल केली होती.

एचसीएचे अध्यक्ष जगन मोहन राव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आयपीएळ फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबाद संघावर वैयक्तिक तिकिटांसह अतिरिक्त तिकीट विक्रीसाठी दबाव आणला होता. एवढेच नाही तर एका लढतीवेळी एचसीएच्या सदस्यांनी अधिक तिकीट देण्यास भाग पाडण्यासाठी कॉर्पोरेट बॉक्स बंद करण्याचा लाजिरवाणा प्रकारही केला. तेलंगणा दक्षता आयोगाने केलेल्या चौकशी दरम्यान हे आरोप सत्य असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

राव यांच्यावर मोफत तिकिटे आणि कॉर्पोरेट बॉक्सच्या तिकिटांसाठी धमकावणे, ब्लॅकमेल करणे असे आरोप होते. 27 मार्च 2025 रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स लढत होती. या लढतीच्या काही तास आधी एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांना देण्यात आलेला एफ3 कॉर्पोरेट बॉक्स बंद करत राव यांच्यासह एचसीएच्या अधिकाऱ्यांनी 20 अतिरिक्त तिकीटं देण्याची मागणी केली. या कृतीमुळे एसआरएच, एचसीए आणि बीसीसीआयसोबतच्या करारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप एसआरएचने केला होता.

या करारानुसार, एचसीएला मैदानाच्या क्षमतेच्या 10 टक्के तिकीटं (3900 तिकीटं) मिळतात. मात्र एचसीएच्या अध्यक्षांनी वैयक्तिक वापरासाठी 10 टक्के कॉम्पिमेंटरी तिकिटांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. ही मागणी अर्थात एसआरएचने फेटाळली. हा वाद वाढत गेला आणि एसआरएचची मालकीन काव्या मारन हिने थेट हैदराबाद सोडण्याचीच धमकी दिली. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशी दरम्यान, एचसीएवर करण्यात आलेले आरोप खरे असल्याचे आढळले. तेलंगणा दक्षता आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आणि एचसीएच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस केली. त्यानंतर राव यांच्यासह अन्य चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.