
हैदराबादमधील वनस्थलपुरममध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध केल्याने अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पकडले जाऊ नये म्हणून मृतदेह घरातच बेडरुममध्ये पुरला. आरोपी मुलगी एक वर्ष आईच्या मृतादेहासोबत घरी राहिली.
अंजू दसारी रामय्या (40) यांचा आपल्या 16 वर्षीय मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. यात रागातून मे 2023 मध्ये अंजू यांची 16 वर्षीय मुलगी आणि तिचा प्रियकर मोंटी कुमार सिंग याने त्यांची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी बेडरूममधील जमिनीखाली खड्डा खणून मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंटचे प्लास्टर केले. यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मुलीने स्वतः पोलीस ठाण्यात आई हरवल्याची तक्रार दाखल केली.
आईची हत्या केल्यानंतर तिने मोंटीशी लग्न केले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या खोलीत आईचा मृतदेह पुरला होता, त्याच घरात ती मुलगी वर्षभर राहत होती. वर्षभरानंतर मे 2024 मध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. यावेळी मुलीच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बेडरुममध्ये जमीन खोदून अंजू यांचा सांगाडा बाहेर काढला. याप्रकरणी मुलीला आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




























































