
होय, मी हिंदुस्थानी क्रिकेटपटू सलीम दुराणीची बायको आहे… एकेकाळी आम्ही वैभव पाहिलंय.. पतीच्या निधनानंतर मी एकटी पडलेय.. माझा बंगला होता तो मी विकला, आता माझ्याकडे काहीही नाही, मी रस्त्यावर आली आहे. भीक मागून पोट भरतेय.. नवी मुंबईच्या बेघर निवारा केंद्रात आणलेल्या एका महिलेने हा दावा केला आणि पोलीसही क्षणभर अवाक् झाले. तिने केलेला दावा खरा की खोटा याचा तपास आता पोलीस करत आहेत. गेले अनेक दिवस अन्न नाही. शरीर अक्षरशः खंगलेले. अंगावर जीर्ण वस्त्र अशा अवस्थेत सीबीडी पोलिसांना एक महिला फिरताना आढळली. पोलिसांनी तिला घणसोलीतील निवारा केंद्रात भरती केले. तिने तिचे नाव रेखा श्रीवास्तव असे सांगून माझ्या नवऱ्याचे नाव क्रिकेटपटू सलीम दुराणी आहे. आम्हाला मूलबाळ नाही. आम्ही श्रीमंत होतो. राजा-महाराजांमध्ये आमची ऊठबस होती, असे या महिलेने सांगताच पोलीस आणि निवारा केंद्रातील कर्मचारी अवाक् झाले. आमच्याकडे गाडी, बंगला सारे काही होते, पण काही परिचितांनी ते हडप केले, असा दावाही त्या महिलेने केला.
खरे की खोटे? यंत्रणा कामाला लागली
स्मृतिभ्रंशाचा विकार असलेल्या या महिलेच्या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील पोलीस यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणाही तिच्या दाव्यातील सत्यता शोधण्यासाठी कामाला लागली आहे. या महिलेची अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही. तिच्या दाव्याचे समर्थन व खंडन करणारे कुणीही अद्याप पुढे आलेले नाही. तूर्त तिची रात्र निवारा केंद्रात राहण्याची सोय करण्यात आल्याची माहिती निवारा केंद्राचे व्यवस्थापक राहुल वाढे यांनी दिली.
































































