जातोय, पण सोडत नाहीय! जयंत पाटील झाले भावुक

मी जातो आहे, पण सोडत नाही. नाव असेल किंवा नसेल कामातूनच ओळख मिळेल. कारण मी जयंत आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची योग्य वेळ असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला. आपल्या कार्यकाळावर प्रकाश टाकताना त्यांना गहिवरून आले होते. 2633 दिवस आपण प्रदेशाध्यक्ष होतो. या सात वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. सगळे सहकारी सोडून गेले तरी आपण शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो. वेगळा गट बनवण्याचे पाप केले नाही, असे सांगताना जयंत पाटील भावूक झाले.

प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात घडलेल्या घडामोडी आणि घटनांची माहिती देताना जयंत पाटील म्हणाले, आपल्या कार्यकाळात सामान्य माणसाचा थेट संपर्क शरद पवारांसोबत झाला. परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने 7600 किलोमीटर प्रवास केला. निवडणूक लढवत नव्हतो त्या भागातही आम्ही पोहोचलो, असे जयंत पाटील म्हणाले.

हे शरद पवारांच्या कष्टाच फळ

पक्षफुटीनंतरही घाबरून न जाता जागेवर राहण्याचा निर्णय आपण घेतला. लोकसभेला 10 पैकी आठ खासदार निवडून आले. हे शरद पवार यांच्या कष्टाचे फळ आहे, असे जयंत पाटील म्हणाले. आपली वेगळी कुठलीही संघटना नाही किंवा वेगळा गट कधी केला नाही, शरद पवार जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला, असे ते म्हणाले.