
मणिपूरमध्ये महिलांची सुरक्षा चिंतेचा विषय असतानाच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तेथील भीषण परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. मी मणिपूरला गेलो होतो तेव्हा मला भेटण्यासाठी वृद्ध महिला पुढे आली. तिच्या डोळय़ांत अश्रू होते, ती हात जोडून मला म्हणाली, दादा, असाच राहा. त्या महिलेचे वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले, अशा शब्दांत गवई यांनी मणिपूर भेटीची आठवण सांगितली. न्यायाचा प्रकाश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात कायदेशीर मदतीसंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश गवई बोलत होते. कायदेशीर सेवा एक चळवळ असून त्याचे परिणाम आकडेवारी किंवा वार्षिक अहवालांमध्ये नाही, तर दुर्लक्षित नागरिकांच्या आत्मविश्वास आणि कृतज्ञतेमध्ये दिसून येतात, असे सांगतानाच सरन्यायाधीशांनी मणिपूरच्या भेटीचा उल्लेख केला.
काही महिन्यांपूर्वीच मी एनएएलएसएचा कार्यकारी अध्यक्ष असताना माझ्या सहकाऱयांसह मणिपूरला गेलो होतो. तेथे चुराचंदपूर येथील एका शिबिरात विस्थापितांना साहित्य वाटप करण्यास गेलो. तिथे एक वृद्ध महिला पुढे आली. तिच्या डोळय़ांत अश्रू होते, ती हात जोडून मला म्हणाली, दादा, असाच राहा. ते वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. आपल्या यशाचे खरे मोजमाप आकडय़ांमध्ये नव्हे, तर सामान्य माणसाच्या विश्वासात आहे, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले.
न्याय हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नाही!
न्याय हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नाही. न्याय प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे न्यायाधीश व वकिलांचे कर्तव्य आहे. कायदेशीर चळवळीचे खरे प्रतिफळ आकडेवारी किंवा वार्षिक अहवालांमध्ये नाही, तर दुर्लक्षित नागरिकांची कृतज्ञता आणि त्यांच्या आत्मविश्वासात आहे, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.

























































