
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असे उद्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‘आयएएनएस-सीवोटर’ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 72.1 टक्के लोकांनी मोदींच्या काळात महागाईने कळस गाठला असल्याचे म्हटले आहे.
2014 नंतर आर्थिक पातळीवर मोदी सरकारच्या अपयशाने यंदा शिखर गाठले आहे. 2015 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात फक्त 17.1 टक्के लोकांनीच महागाई वाढल्याचे म्हटले होते. 2020 मधील सर्वेक्षणामध्ये फक्त 10.8 टक्के लोकांनी वस्तूंच्या किमती कमी झाल्याचे म्हटले होते, तर 12.8 टक्के लोकांनी परिस्थिती होती तशीच आहे असे उत्तर दिले होते.
गेल्या एक वर्षात महागाईमुळे लोकांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे 38.2 टक्के लोकांनी या सर्वेक्षणात म्हटले आहे तर 34.3 टक्के लोकांनी थोडाफारच परिणाम झाल्याचे नमूद केले आहे. 48.4 टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात सामान्य नागरिकांना जगणे कठीण होऊन गेल्याचे म्हटले आहे तर 28.8 टक्के लोकांनी सामान्य माणसाचा जीवनस्तर सुधारला असल्याचे म्हटले आहे.
येणाऱया वर्षात परिस्थिती सुधारेल अशी आशा 37.4 टक्के लोकांनी व्यक्त केली आहे तर 25.8 टक्के लोकांना ती आणखी बिघडेल अशी भीती वाटत आहे. 21.7 टक्के लोकांना मात्र ती ‘जैसे थे’ राहील असे वाटते. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना चार माणसांच्या पुटुंबाला जगण्यास दरमहा किमान 20 हजार रुपये पाहिजेत असे वाटते तर 23.6 टक्के लोकांनी दरमहा 30 हजार रुपयांची गरज असल्याचे म्हटले आहे.
सरकारची कामगिरी असमाधानकारक
‘आयएएनएस-सीवोटर’ने केलेल्या सर्वेक्षणात फक्त 31.7 टक्के लोकांनीच मोदी सरकारची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळात आर्थिक बाबतीत सरकारची कामगिरी असमाधानकारक राहिल्याचे 46.4 टक्के लोकांनी सांगितले. मनमोहन सिंग यांच्यानंतर केंद्र सरकारची ही सर्वात खराब कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे.




























































