मेस्सीच्या हाती टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट अन् हिंदुस्थानी फुटबॉलच्या मनात फिफा स्वप्न!

क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा राजा आला आणि एका क्षणात दोन स्वप्ने समोरासमोर उभी ठाकली. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या हाती टी-20 वर्ल्ड कप 2026चे तिकीट देण्यात आले आणि त्याचवेळी हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमींच्या मनात एक जुने, पण अजूनही जिवंत असलेले स्वप्न पुन्हा जागे झाले. ते म्हणजे हिंदुस्थानी संघाला फिफा वर्ल्ड कपचे तिकीट कधी?

मेस्सीच्या गोट इंडिया टूरच्या अखेरच्या टप्प्यावर अरुण जेटली स्टेडियमवर हा क्षण साकारला गेला. आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते मेस्सीला हिंदुस्थान-अमेरिका टी-20 वर्ल्ड कप सामन्याचे तिकीट प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि डीडीसीए अध्यक्ष रोहन जेटली यांची उपस्थिती होती.

क्रिकेट आणि फुटबॉलचा हा दुर्मिळ संगम पाहताना स्टेडियममधील प्रत्येक टाळीमागे एक भावना दडलेली होती. ज्या देशात फुटबॉलचा सम्राट क्रिकेटच्या विश्वचषकाचा पाहुणा होतो, त्या देशाचा फुटबॉल विश्वचषकाचा भाग कधी होणार? मेस्सीला सहकारी रोड्रिगो डी पॉल आणि लुईस सुआरेज यांना फ्रेम केलेली क्रिकेट बॅट आणि टीम इंडियाची जर्सी भेट देण्यात आली. माजी हिंदुस्थानी गोलरक्षक अदिती चौहानने तिघांनाही स्वाक्षरी केलेली टी-शर्ट भेट दिली. स्टेडियममध्ये ‘मेस्सी… मेस्सी…’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. भारावलेला मेस्सी म्हणाला, हिंदुस्थानमध्ये आम्हाला जे प्रेम मिळाले, ते शब्दांत सांगता येणार नाही. हा अनुभव विलक्षण आहे. हा दौरा छोटा असला तरी संस्मरणीय होता. आम्ही नक्कीच पुन्हा येऊ.

मेस्सीचा हा दौरा केवळ सेलिब्रिटी भेट ठरला नाही, तर तो आरसा ठरला. क्रिकेटच्या भव्यतेत न्हालेल्या हिंदुस्थानला फुटबॉलची स्वतःची ओळख शोधण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली.  मेस्सीच्या या दौऱयात काल वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरसह  क्रीडाविश्वातील दिग्गजांशी संवाद साधत, तर हैदराबादच्या उप्पल स्टेडियमवर व्हीआयपी बॉक्समध्ये बसून चाहत्यांना अभिवादन करत मेस्सीने हिंदुस्थानच्या फुटबॉलमध्ये फिफा वर्ल्ड कप पात्रतेसाठी जोश भरला आहे. मेस्सीची जोशरूपी ठिणगी हिंदुस्थानात फुटबॉलचा वणवा पेटवेल अशी आशा आहे.