श्रीलंकन मंडळावर आयसीसीचेही निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकन संघाला आयसीसीने आणखी एक जबर धक्का दिला आहे.  आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे (एसएलसी) सदस्यत्व तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय आयसीसीने आज झालेल्या बैठकीत घेतला. एसएलसीच्या कारभारात तेथील सरकार हस्तक्षेप करत असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले होते. जे आयसीसीच्या नियमांविरोधात असल्यामुळे त्यांनी एसएलसीच्या निलंबनाचा मोठा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी वर्ल्ड कपमधील सुमार कामगिरीमुळे श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी एसएलसी बरखास्त केले होते.

आयसीसीच्या बैठकीत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले. श्रीलंकन बोर्डाने आयसीसीचा एक सदस्य म्हणून नियमांचे सर्रास उल्लंघन केले आहे. त्यांच्या व्यवहारांचे स्वायत्तपणे व्यवस्थापन केले नाही. त्यांच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेपही मोठय़ा प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आयसीसीला हा गंभीर निर्णय घ्यावा लागला. निलंबनाच्या अटींबाबत आयसीसी बोर्ड योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र या निर्णयामुळे लंकेला आता आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. आयसीसीने याआधी झिम्बाब्वे क्रिकेट मंडळालाही निलंबित केले होते. त्यामुळे झिम्बाब्वेचे क्रिकेट रसातळाला गेले आहे.