ICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला

5276

हिंदुस्थान आणि बांगलादेशमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी लढतीनंतर आयसीसीने आपली ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत गोलंदाजीमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हनुमान उडी घेत टॉप 10 मध्ये स्थान पटकावले आहे. शमी कारकीर्दीतील सर्वोच्च अशा आठव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी लढतीपूर्वी तो 15 व्या स्थानावर होता.

शनिवारी इंदूरमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर एक डाव आणि 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयामध्ये सलामीवीर मयांक अग्रवालसह वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानेही मोलाचे योगदान दिले. शमीने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 असे एकूण 7 बळी टिपले. याचा त्याला आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत फायदा झाला असून आठ अंकांनी उसळी घेत तो टॉप 10मध्ये पोहोचला आहे.

#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…

मोहम्मद शमीसह टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आर. अश्विन याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. अश्विनला एका स्थानाचा फायदा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या