हिंदुस्थानातच खेळा, अन्यथा गुण गमवा! बांगलादेशच्या स्थळबदल मागणीवर आयसीसीची कठोर भूमिका

टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) उगारलेली स्थळबदलाची तलवार आयसीसीने एका झटक्यात मोडून काढली आहे. मुस्तफिजुर रहमान प्रकरणावरून चिडलेल्या बांगलादेशने आपले वर्ल्ड कप सामने हिंदुस्थानऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती, मात्र आयसीसीने ही मागणी साफ फेटाळत बांगलादेशला थेट आणि कठोर इशारा दिला. हिंदुस्थानातच खेळा, अन्यथा गुणकपात अटळ आहे.

आयपीएलपूर्व घडलेल्या घडामोडींमुळे हा वाद अधिक पेटला. कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त केल्यानंतर संतप्त झालेल्या बीसीबीने बांगलादेशात आयपीएलचे थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशने हिंदुस्थानात होणारे टी-20 वर्ल्ड कप सामने न खेळण्याची भूमिका घेतली आणि हे सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली.

मात्र आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत बांगलादेशला स्पष्ट शब्दांत नकार देण्यात आला. टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानात येणे बंधनकारक आहे. संघ न आल्यास गुणकपात केली जाईल, असा कठोर संदेश आयसीसीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत सामने दुसऱया देशात हलविण्याची मागणी मान्य होणार नाही, अशी भूमिका आयसीसीने ठामपणे मांडली.

या बैठकीनंतर अद्याप बीसीसीआय, बीसीबी किंवा आयसीसीकडून कोणतीही अधिपृत घोषणा झालेली नसली तरी आयसीसीची भूमिका अत्यंत कठोर आणि स्पष्ट असल्याचे समोर आले आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा येत्या 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान हिंदुस्थान आणि श्रीलंका येथे होणार आहे. गट ‘क’मध्ये असलेला बांगलादेश संघ कोलकात्यातून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडीज, 9 फेब्रुवारीला इटली आणि 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध त्यांचे सामने आहेत. त्यानंतर 17 फेब्रुवारीला मुंबईत नेपाळविरुद्ध गटातील अखेरचा सामना खेळला जाणार आहे.

हा वाद अधिक चिघळण्यामागे आयपीएलमधील निर्णय कारणीभूत ठरला. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजुर रहमानचा 9.20 कोटी रुपयांचा करार संपविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उघड केले. हिंदुस्थान-बांगलादेशमधील तणावपूर्ण राजकीय परिस्थिती आणि सुरक्षेचे मुद्दे यामागचे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, हा निर्णय आयपीएल गव्हार्ंनग काwन्सिलच्या बैठकीविना, थेट बीसीसीआयच्या सर्वोच्च पातळीवरून घेण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र आयसीसीच्या भूमिकेमुळे आता बांगलादेशसमोर दोनच पर्याय उरले आहेत, हिंदुस्थानात येऊन वर्ल्ड कप खेळा किंवा थेट गुण गमवा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने दिलेल्या या इशाऱयामुळे बांगलादेशच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वर्ल्ड कपच्या राजकारणाला आता मैदानावर उतरावे लागणार, हे मात्र निश्चित आहे.