
मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोरोना रुग्णांबरोबरच अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आठवडाभरात 100 आयसीयू आणि 100 व्हेंटिलेटर वाढवण्यात येणार आहेत. शिवाय भायखळा येथील रिचर्डस्न अॅण्ड क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये एक हजार ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.
मुंबईत ऑक्सिजन बेडची मागणीही वाढली आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने बेड वाढवावेत अशी मागणी केली जात होती. भायखळ्याच्या रिचर्डस्न अॅण्ड क्रुडास या ठिकाणी या ठिकाणी एक हजार बेड मागील काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने कमी करण्यात आले होते. तर सुमारे 500 बेड परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाइनसाठी ठेवण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हे सर्व बेड कोरोना रुग्णांसाठी सुरू करावेत अशी मागणी स्थायी समितीमध्येही करण्यात आली होती.
या ठिकाणचे ऑक्सिजन बेड तातडीने सुरू करावेत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते. शिवाय कोरोना रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय साधनांच्या खरेदीत कोणतीही हयगय न करता खरेदी करावी व नंतर स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घ्यावी असे निर्देशही देण्यात आले होते.
…म्हणूनच घेतला निर्णय
कोरोनाच्या दुसऱया लाटेत सुरुवातीच्या दिवसांत कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. मात्र यामुळे फुप्फुसात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने शरीराला ऑक्सिजन पुरवठा होण्यात अडथळे येतात. त्यामुळे प्रकृती अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत मुंबईत 1427 अत्यवस्थ रुग्ण आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटरची मागणी वाढत असल्यामुळे असे बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत फक्त 51 आयसीयू, 19 व्हेंटिलेटर रिक्त
- पालिकेकडे एकूण 11,124 ऑक्सिजन बेड आहेत. यातील 10,028 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1096 बेड रिक्त आहेत.
- जम्बो सेंटर आणि विविध रुग्णालयांत 2849 आयसीयू बेड आहेत. यामधील 2798 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर केवळ 51 बेड रिक्त आहेत.
- मुंबईतील एकूण 1451 व्हेंटिलेटर बेडपैकी 1432 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर केवळ 19 बेड रिक्त आहेत.




























































