देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

व्होडाफोनआयडियाच्या याचिकेवर सुनावणी

दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 26 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. 2016-17 पर्यंतचा अतिरिक्त एजीआरला रद्द करण्यासाठी कंपनीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सरन्यायाधीश बी. आर. गवई, न्यायाधीश के. विनोद चंद्रन आणि न्यायाधीश एन. वी. अंजारिया यांच्या खंडपीठापुढे पुढील शुक्रवारी ही सुनावणी पार पडणार आहे. कंपनीकडून ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतोगी आणि केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडतील.

वरवर राव यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते आणि कवी पी. वरवर राव यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. जामीन याचिकेच्या शर्तीमध्ये संशोधन करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. राव यांना 2018 मध्ये भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश जेके माहेश्वरी आणि न्यायाधीश विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास स्पष्ट शब्दांत नकार देत ही याचिका फेटाळून लावली.

बलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात आठ जण ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या कारच्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. यात दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. पहिली घटना तुर्बत जिह्यात झाली, तर दुसरी घटना अफगाण सीमेजवळील चमन शहरात घडली. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.

पाकिस्तानी सिंधी समाजाचे जिनेव्हात आंदोलन

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 60 व्या सत्रावेळी पाकिस्तानातील सिंधी कार्यकर्त्यांनी आणि मानवाधिकार समूहांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. पाकिस्तान सरकार आणि सैन्यांकडून सिंधी समाजावर अन्याय-अत्याचार होत आहे, तो तत्काळ थांबवण्यात यावा, अशी मागणी केली. सिंधी समाजाच्या मुलींचे बळजबरी धर्मांतर करणे, जमीन बळकावणे यांसारख्या घटना वाढल्या आहेत, असे म्हटले.

नेपाळचे माजी पंतप्रधान ओली बॅरेकमधून बाहेर

नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी) एमालेचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे सैन्याच्या बॅरकमधून बाहेर आले. झेन-झी आंदोलनादरम्यान त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव नेपाळी लष्कराने बॅरेकमध्ये ठेवले होते. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर 9 सप्टेंबरपासून ते बॅरकमध्ये होते. आता त्यांना भक्तपूरच्या गुंडू परिसरात ठेवण्यात आले आहे.