
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदिगड शाखेत तब्बल 590 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे हा डल्ला बँकेबाहेरील कोणत्या दरोडेखोराने नाही, तर बँकेच्याच काही कर्मचाऱ्यांनी संगनमताने हरियाणा सरकारच्या खात्यांमध्ये गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बँकेतील चार अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे.
हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून सर्व रक्कम दुसऱ्या बँकेत वळवण्याचा अर्ज केला होता. जेव्हा बँकेने कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा सरकारी रेकॉर्डमधील शिल्लक आणि बँकेच्या सिस्टिममधील शिल्लक यात मोठी तफावत आढळली. 18 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या तपासात हरियाणा सरकारच्या इतर विभागांच्या खात्यातूनही कोटय़वधी रुपये गायब असल्याचे समोर आले. 21 फेब्रुवारी रोजी बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा सुमारे 590 कोटी रुपयांच्या घरात आहे.
अधिकाऱ्यांचे निलंबन
तपासाला बाधा येऊ नये म्हणून बँकेने संशयित चार अधिकाऱयांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने तातडीने पोलिसात एफआयआर दाखल केला असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एका स्वतंत्र बाह्य यंत्रणेमार्फत ‘फॉरेंसिक ऑडिट’ केले जाणार आहे. ज्या बँकांमध्ये हा पैसा वळवण्यात आला आहे, त्यांना सूचित करून संबंधित खात्यांवर ‘लियन मार्क’ म्हणजेच फ्रीझ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा गैरव्यवहार केवळ हरियाणा सरकारशी संबंधित ठरावीक खात्यांपुरताच मर्यादित आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य खातेदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन बँकेने केले.

























































