आयडॉलचा आज 51 वा वर्धापन दिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा (आयडॉल) वर्धापन दिन उद्या बुधवार, 24 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.15 दरम्यान ऑनलाइन होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आशीष चौहान हे ‘दूरस्थ शिक्षणात उद्योग व शैक्षणिक सहकार्याची गरज’ या विषयावर संवाद साधणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम ऑनलाइन होत असून आयडॉलच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह होणार आहे. तसेच ‘एकलव्य’ हे अनियतकालिक व ‘आयडॉल एक ओळख’ या पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी होणार आहे.

आयडॉलची स्थापना 1971 साली झाली. 2020-2021 हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 1971 पासून आजपर्यंत आयडॉलमधून जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक मान्यवरांनी आपले शिक्षण आयडॉलमधून पूर्ण केले. तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकही शिक्षण घेत आहेत. या शैक्षणिक वर्षात 64 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात आयडॉल अनेक पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रम सुरू करणार आहे.