आयईएस न्यू  इंग्लिश स्कूल संघाने पटकावली हॅरिस ढाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान प्राप्त करणाऱया हॅरिस ढाल क्रिकेट स्पर्धेच्या (16 वर्षांखालील)  अंतिम लढतीत यंदा इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वांद्रे आणि दादरच्या शाळांत जोरदार झुंज रंगली. अखेर आयईएस न्यू  इंग्लिश स्कूल, वांद्रे संघाने दादरच्या आयईएस सुळे गुरुजी विद्यालय संघावर 4 विकेट आणि 5 चेंडू राखून विजय मिळवत हॅरिस ढालीवर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे स्पर्धेला 125 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्पर्धेची  अंतिम लढत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगली.

  मुंबई स्पोर्टस् स्कूल असोसिएशन (एमएसएसए) आयोजित यंदाची हॅरिस ढाल स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. त्यातील लढतीत आयईएस सुळे गुरुजी विद्यालय, इंग्रजी माध्यम (दादर)  संघाने दुसऱया डावात  40 षटकांत 171 धावांची नोंद करीत आयईएस न्यू इंग्लिश स्कूल संघाला विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या आरुष पाटणकरने 90 चेंडूंत 95 धावांची नाबाद झुंझार खेळी करीत आपल्या संघाला 4 विकेट आणि 5 चेंडू राखून चुरशीचा विजय मिळवून दिला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील.ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते बोमन इराणी आणि एमसीएच्या मैदान आणि स्टेडियम समितीचे प्रमुख नदीम मेमन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सुळे गुरुजी विद्यालय संघाचे नेतृत्व यश चव्हाणने तर विजेत्या न्यू इंग्लिश स्कूल संघाचे नेतृत्व ओमकार पाटणकर याने केले.

संक्षिप्त धावफलक

 व्ही.एन. सुळे गुरुजी विद्यालय, दादर 197 आणि 40 षटकांत 171 (आयुष म्हात्रे 38, दर्श मुरकुटे 55, विशाल कांबळे 30; अगस्थ्य बंगेरा 57 धावांत 5 विकेट ) पराभूत वि. आयईएस न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे– 187 आणि 39.1 षटकांत 6 बाद 185 ( आयुष पाटणकर नाबाद 95)  स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके. सर्वोत्तम फलंदाजः आयुष म्हात्रे  (सुळे गुरुजी विद्यालय, 5 लढतींत 565 धावा ).सर्वोत्तम गोलंदाजः पार्थ अंकोलेकर ( सुळे गुरुजी, 14 विकेट). सर्वोत्तम क्षेत्ररक्षकः अनंत देसाई (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे)