
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळाल? असा सवाल एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हा सवाल विचारला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी यांच्या पूर्वीच्या विधानाचा दाखला देत म्हणाले की, “पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही. मग माझा सरकारला प्रश्न आहे की, बैसरनच्या खोऱ्यात ज्या लोकांचा जीव गेला, त्यांच्या रक्ताचा तुमच्या अंतःकरणाला प्रश्न पडत नाही का? तुम्ही व्यापार बंद केला, त्यांच्या बोटींना आपल्या समुद्रात येण्याची परवानगी नाही. मग कोणत्या आधारावर तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळणार आहात? रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे ठरवून तुम्ही क्रिकेट खेळणार का?”