
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल (RSS) मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “जर काँग्रेस पुन्हा केंद्रात सत्तेत आली तर, आरएसएसवर देशभर बंदी घातली जाईल.” ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
प्रियांक खर्गे म्हणाले आहेत की, “देशात द्वेष कोण पसरवत आहे, सांप्रदायिक हिंसाचाराला कोण जबाबदार आहे, संविधान बदलण्याबद्दल कोण बोलत आहे? ते म्हणाले की, देशात बेरोजगारी का वाढत आहे, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला, असे महत्त्वाचे प्रश्न संघ त्यांच्या राजकीय शाखेच्या भाजपला का विचारत नाही? हे न विचारता संघाचे लोक समाजात द्वेष पसरवत आहेत.
प्रियांक खर्गे म्हणाले, ईडी, आयटी सारख्या सर्व तपास संस्था फक्त विरोधकांसाठी आहेत का? सरकार आरएसएसची चौकशी का करत नाही, त्यांना पैसे कुठून मिळतात, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे? ते म्हणाले की, संघाचे लोक द्वेषपूर्ण भाषण देऊन आणि प्रत्येक वेळी संविधान बदलण्याबद्दल बोलून कसे सुटतात, आर्थिक गुन्हे करून ते कसे सुटतात, या सर्व मुद्द्यांची चौकशी झाली पाहिजे.