सामना प्रतिनिधी । नेवासा
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ७ ऑगस्टला आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करणार असेल, तर ९ ऑगस्टला मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही, असे मत भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्त केले. रविवारी दुपारी भाजप कार्यालयात पत्रकारांशी आमदार बाळासाहेब मुरकुटे बोलत होते.
आमदार मुरकुटे म्हणाले की,१९८० पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून वेळोवेळी प्रयत्न झाले. २०१४ मध्ये आघाडी सरकारच्या काळात घाईघाईत आरक्षण दिले होते. मात्र, ते न्यायालयात टिकले नाही म्हणून कायद्यात बसेल आणि न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध आयोग स्थापन केले होते. न्या. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ७ ऑगस्टला येणार आहे. तो अहवाल येताच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध पक्ष प्रमुख, जेष्ठ विचारवंत यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळणार आहे, असे मुरकुटे म्हणाले.
मराठा , मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने आतापर्यंत १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती, वसतीगृह, नोकरीत आरक्षण असे कल्याणकारी निर्णय मराठा समाजासाठी घेतले आहेत, असे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.




























































