मोकाट गुरे रस्त्यावर सोडल्यास लिलाव करू; मुरुड नगर परिषदेचा शेतकऱ्यांना इशारा

निसर्गरम्य मुरुड जंजिऱ्यातील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून गाय, बैल, वासरे, घोडे ही जनावरे मनमानीपणे कुठेही फिरत असल्याचे दिसून येत आहे. सैरभैर झालेल्या या प्राण्यांना कुणीच वाली नसल्याने त्याचा वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्याची गंभीर दखल नगर परिषदेने घेतली आहे. यापुढे मोकाट गुरे रस्त्यावर सोडली तर ती जप्त करून त्याचा थेट लिलाव करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

मुरुडसह परिसरातील रस्त्यांवर मोकाट गुरांनी ठाण मांडल्याने वाह-तुकीला अडथळा निर्माण होतो. बाजारपेठेत अचानक ही जानावरे घुसून धिंगाणा घालतात. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना धडक दिल्यास त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी नागरिकांनी नगर परिषदेकडे अनेक तक्रारी केल्या. या मोकाट गुरांना मालकांनी ताबडतोब आवरावे, नाहीतर ही गुरे जप्त करून लिलाव करण्यात येईल असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाईचा बडगादेखील उगारण्यात येणार आहे.

…तर मालक जबाबदार
मुरुड-जंजिरा नगर परिषदेच्या शांतता समिती बैठकीत शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर गंभीर चर्चा होऊन शेतकरी तसेच नागरिकांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. गुरे कुणाला चावली तर त्याची जबाबदारी मालकांवर राहील असा थेट इशाराच देण्यात आला आहे.