
तेलकट त्वचेसाठी बाजारात अनेक प्रकारचे फेस पॅक उपलब्ध आहेत. यापैकी सगळीच उत्पादने पूर्णपणे केमिकलमुक्त असतातच असे नाही. ही उत्पादने महागडी असूनही त्वचेवर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येणे, पुरळ उठणे, एक्ने यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. या महागड्या उत्पादनांऐवजी काही नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेल्या फेस पॅकचा वापर करता येऊ शकतो. चेहरा तेलकट असेल तर जास्त काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी घरच्या घरी उपाय करता येतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. त्वचेवरील तेलकटपणा दूर होतोच शिवाय त्वचा तेलमुक्त होण्याबरोबरच त्वचेचा पोत सुधारायलादेखील मदत होईल. पाहूया घरगुती नैसर्गिक फेस पॅकविषयी…
केळ आणि मध फेस पॅक
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. केळं आणि मध त्वचा हायड्रेट ठेवण्याकरिता उपयुक्त आहेत. यांच्या वापराने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही कमी व्हायला मदत होते. याकरिता एक पिकलेले केळं स्मॅश करा. त्यामध्ये मध घालून व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. हा फेस पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
लिंबू आणि दह्याचा फेस पॅक
दही आणि लिंबात जीवनसत्त्व सी आणि सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे या पदार्थांचा फेस पॅक तयार केल्यावर चेहरा मुलायम आणि चमकदार होतो. तसेच लिंबू आणि दह्यामध्ये एक्सफ्लोएटिंग आणि प्रोबायोटिक्स गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहरा आईल फ्री होतो. एक चमचा लिंबाच्या रसात एक मोठा चमचा दही आणि अर्धा चमचा हळद घालून फेस पॅक तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून अर्ध्या तासाने चेहरा धुवा.
काकडी आणि डाळीचं पीठ
तेलकट त्वचेसाठी बेसन (डाळीचं) पीठ खूप फायदेशीर ठरते. बसन पीठामुळे त्वचेतील तेल शोषून घेतले जाते. बेसन आणि काकडीचे मिश्रण त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी आणि त्वचेवरील छिद्रांमध्ये साचलेले तेल बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याकरिता एक चमचा काकडीचा रस घ्या. त्यात 2 ते 3 चमचे बेसन आणि अर्धा चमचा हळद घाला. हे सर्व व्यवस्थित मिसळून हा फेस पॅक अर्धा तास चेहऱ्याला लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.



























































