
मध्य पूर्वेमध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिकेत गेल्या 23 दिवसांपासून युद्धाचा भडका उडालेला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरही लष्करी संघर्ष सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्येही गेल्या अडीच-तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे जगावर सध्या महायुद्धाचे सावट घोंघावत आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंधही तणावाचे राहिले आहेत. अशातच पाकिस्तानचे हिंदुस्थानातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी विखारी फूत्कार सोडले आहेत.
जर अमेरिकेने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना लक्ष्य केले, तर पाकिस्तान कोणताही मागचा पुढचा विचार न करता हिंदुस्थानची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला करेल, असे बासित म्हणाले. एका काल्पनिक युद्धाच्या परिस्थितीवर चर्चा करताना बासित यांनी हे विधान केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आपल्याला दुसऱ्या क्षणाचाही विचार न करता हिंदुस्थान, मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करावा लागेल. त्यानंतर काय होईल, ते नंतर पाहू, असे बासित म्हणाले. अशी परिस्थिती उद्भवणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. त्यानंतरही त्यांनी वारंवार हिंदुस्थानला टार्गेट करण्याचे पुनरुच्चार केला.
जर कोणी पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर पाकिस्तानकडे हिंदुस्थानवर हल्ला करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आम्हाला हे घडावे असे वाटत नाही आणि हिंदुस्थानलाही वाटत नाही, पण अशी वेळ आली तर आम्ही मागे हटणार नाही, असेही बासित यांनी म्हटले.
दरम्यान, अब्दुल बासित यांनी 2014 ते 2017 या काळात हिंदुस्थानात पाकिस्तानचे राजदूत म्हणून काम केले आहे. त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याने असे विखारी फूत्कार सोडल्याने पाकड्यांचे शेपूट कायम वाकडेच राहणार हे अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे हे पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत संबंध बिघडलेले असताना बासित यांनी हे विधान केले आहे. यावर अद्याप हिंदुस्थान सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

























































