
थर्टी फर्स्टचे काऊंटडाऊन आतापासूनच सुरू झाले आहे. समुद्रकिनारे, सोसायट्या, हॉल, बंगले, हॉटेल्स, रिसॉर्टस् येथे तरुण-तरुणींचे जथ्थेच्या जथ्थे येण्यास सुरुवात झाली आहे. नाताळची सुट्टी लागल्याने ‘फुल्ल टू धम्माल’चा माहोल सर्वत्र दिसून येत आहे. तुम्ही थर्टी फर्स्ट जरूर साजरा करा, पण धिंगाणा घालाल तर ‘हॅप्पी न्यू इअर’ कोठडीतच साजरी करावी लागेल. पालघर पोलिसांनी तसा कडक इशाराच दिला असल्याने बच के रहना रे बाबा बच के रहना रे..
थर्टी फर्स्टच्या नावाखाली अनेक जण दारू पिऊन धिंगाणा घालतात. मनमानीपणे गाड्यादेखील चाल वतात. दारूच्या नशेत महिलांची छेडछाड केली जाते. रस्त्यांवर विनाकारण गोंधळही घातला जातो. अशा मद्यपींवर पालघर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट्स, महामार्ग, चौक, रेल्वे स्थानके आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऑन द स्पॉट कारवाई
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक, दंगा नियंत्रण पथक, महिला पोलीस व साध्या वेशातील पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करून तत्काळ कारवाई केली जाणार असून वाहन जप्ती, दंड व गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ष्या, मोठ्या आवाजातील संगीत, फटाक्यांचा वापर यावरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही, ड्रोनचा वॉच
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन निरीक्षण, नाकाबंदी, वाहन तपासणी आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून शांततेत आणि सुरक्षितपणे नववर्ष साजरे करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





























































