पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर देता मग आम्हाला भिकेला का लावता! बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांचे मंत्रालयासमोर सहकुटुंब आंदोलन

नववर्षारंभीच आज मंत्रालयासमोर हिंदुस्थानी लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांनी राज्य आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात आक्रोश केला. लष्करी शिस्तीच्या नावाखाली चंदू चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ केले गेले आहे. ते एकप्रकारे मानवाधिकाराचे उल्लंघनच असल्याचा त्यांचा आरोप असून, पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर देता मग आम्हाला भिकेला का लावता, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

चंदू चव्हाण हे धुळे जिह्यातील आहेत. सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱया दिवशी हिंदुस्थानची सीमा ओलांडून ते पाकिस्तानच्या हद्दीrत गेल्याने त्यांना अटक झाली होती. युद्धबंदी म्हणून ते पाकिस्तानच्या ताब्यात 3 महिने 21 दिवस होते. केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांनंतर ते पुन्हा हिंदुस्थानात परतले होते. त्यानंतर लष्कराच्या चौकशीत दोषी ठरवून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

चंदू चव्हाण यांनी या कारवाईच्या विरोधात अनेकदा वेगवेगळय़ा ठिकाणी आंदोलने केली, पण केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर त्यांनी मुंबईत धडक मारली आणि लष्करी गणवेशात मंत्रालयासमोर आंदोलन केले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगाही होता. विविध मागण्यांची पाटी त्यांनी गळय़ात घातली होती. मी सैन्यात अकरा वर्षे सेवा दिली. त्यानंतर मला घरी पाठवून दिले. मला पाच शिक्षा झाल्या. आता तुम्ही घरी जा असे मला सांगण्यात आले. मला चुकीच्या पद्धतीने आणि सूडभावनेतून शिक्षा दिली आहे. मला 1950 च्या कायद्यानुसार शिक्षा दिली आहे. यातून मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे. माझे म्हणणेच ऐकून घेतले जात नाही. माझ्यावर बारा लाख रुपयांचे कर्ज आहे. मला दोन वर्षांचा लहान मुलगा आहे. मी काय करावे, असा उद्विग्न सवालही चंदू चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

आमच्या हाती कटोरा

मी पाकिस्तानात गेलो म्हणून मला शिक्षा दिली. शत्रुराष्ट्रात घुसला आणि दोन जणांना ठार मारलं असा माझ्यावर ठपका ठेवला. मग सर्जिकल स्ट्राईक कसा झाला ते मला सांगावे. जर मी युद्धपैदी होतो तर मग मला का शिक्षा दिली, असा सवाल त्यांनी केला. हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्धमान यांनी छातीवर मेडल लावलं आणि आम्ही कटोरा घेऊन भीक मागतो. मी पाकिस्तानात गेलो आणि पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जाते. आता मी पत्नीला घेऊन पाकिस्तानमध्ये नोकरीला जातो, अशा शब्दांत चव्हाण यांनी संताप व्यक्त केल्याने पोलिसांनी चंदू चव्हाण यांना ताब्यात घेतले.

चुकीच्या कारवाईमुळे जवानांच्या आत्महत्या होताहेत

आम्ही सैन्यात देशसेवा करायला जातो. दहशतवादी व्हायला जात नाही. आतापर्यंत 15 लाख जवानांना लष्करी सेवेतून काढले आहे. शिस्तीच्या नावाखाली अधिकारी जवानांना घरी पाठवतात. जवानांना दिलेल्या शिक्षेचे व्हिडीओ शूटिंग झाले पाहिजे. त्यामुळे चुकीची शिक्षा दिली जाणार नाही. माझ्या ओळखीचे अनेक जवान आहेत. त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे. काहींनी आत्महत्या केल्या. जवानांना पाच-सात वर्षांत काढून टाकतात. हा घोटाळा आपण बाहेर काढणार आहे, असा इशाराही चंदू चव्हाण यांनी यावेळी दिला.

मला अद्यापही शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही किंवा पेन्शनही लागू केलेली नाही. लष्करातून बडतर्फ केल्याने खासगी नोकरीही मिळत नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ आलीय. चार महिन्यांपासून मी भीक मागत आहे, असे चंदू चव्हाण यांनी सांगितले.