
चिनी मोबाईल ऍप्सवरील बंदीनंतर देशातील आयआयटी संस्थांनीही सरकारला पाठिंबा दिला आहे. आयआयटी संस्थांमधील ‘मेगालॅब’सह सर्व चीनी सॉफ्टवेअर्स आणि यंत्रणा काढून टाका अशी विनंती माजी विद्यार्थ्यांच्या ‘आयआयटीअल्युमनी काऊन्सिल’ने केली आहे.
आयआयटींमध्ये वापरल्या जाणाऱया चिनी सॉफ्टवेअर्स आणि अन्य यंत्रणांना पर्याय शोधण्यासाठी आयआयटी अल्युमनी काऊन्सिल गेल्या काही आठवडय़ांपासून विविध तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थांच्या संपर्कात आहे. आयआयटी संस्थांनी आपल्याला लागणारी सर्व यंत्रणा आणि सॉफ्टवेअर स्वदेशातच विकसित करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी आयआयटी अल्युमनी कौन्सिलने परदेशांमधील माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ आणि आयसीटी मुंबईचेही सहकार्य घेतले जात आहे. भविष्यात आयआयटी संस्था तंत्रज्ञानाच्या बाबतीत केवळ आत्मनिर्भर होणार नाहीत तर तंत्रज्ञान निर्यातही करतील असा विश्वास कौन्सिलचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी व्यक्त केला.





























































