
कौशल्य आणि हस्तकलेशी निगडीत भगवान विश्वकर्मा यांच्या स्मरणार्थ 17 सप्टेंबरला विश्वकर्मा दिनी दीक्षान्त समारंभ आयोजित करण्याचा निर्णय केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार देशातील सर्व आयटीआयमधून अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांचा यंदापासून दीक्षान्त समारंभ करण्यात येणार आहे. येत्या शनिवार, 17 सप्टेंबरला हा समारंभ होणार असून आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा प्रथमच दीक्षान्त समारंभ होत आहे. दीक्षान्त समारंभासाठी ड्रेसकोड ठरविण्यात आला असून प्राचार्य, प्राध्यापक, प्रशिक्षक आणि मुख्य कर्मचारी सदस्यांनी औपचारिक पोशाख आणि औपचारिक शूज, चप्पल घालून यावे. पुरुष आणि महिला प्रशिक्षणार्थींनी त्यांचा आयटीआय गणवेश आणि औपचारिक शूज परिधान करणे आवश्यक आहे.
21 व्या शतकात उद्योगातील आयटीआयची ब्रँड प्रतिमा आणि प्रशिक्षणार्थींचा समुदाय मजबूत करणे आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ होणार आहे. 2020 मध्ये दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले आणि 2021 मध्ये एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ऑगस्ट 2022 मध्ये परीक्षा घेण्यात आली. या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील 81 हजार 830 विद्यार्थ्यांचा आयटीआय संस्थेमध्ये पदवी प्रदान समारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 45 हजार 260 तर एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 36 हजार 570 इतकी आहे.
आयटीआयच्या सहा विभागानुसार अमरावतीमधून 12 हजार 356, संभाजीनगर 11 हजार 769, मुंबई 12 हजार 635, नागपूर 13 हजार 920, नाशिक 14 हजार 903 आणि पुणे 16 हजार 247 विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र हे 200 ते 300 जीएसएमच्या ए 4 आकाराच्या कागदावर रंगीत डिजिटल प्रिंटमध्ये प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे.
प्रत्येक आयटीआयच्या पॅम्पसमध्येच समारंभ घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या पालकांना आमंत्रित करण्यात येईल.
आयटीआयच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांद्वारे एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, प्रशिक्षण, नोकरी मेळा, नोकरी संधी इत्यादी करीअरच्या संधीबाबत मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम राबवण्याच्या सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत.
























































