
चेहरा पाहून भविष्य सांगणाऱ्यांनातुम्ही क्वचितच भेटला असाल, पण नुसती चेहरेपट्टी पाहून एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती कथन करणाऱया रोबोला भेटण्याची संधी मुंबईकरांना चालून आली आहे. हिंदुस्थानात पहिल्यांदाच अल्बर्ट आईन्स्टाईन रोबोट येणार असून हा रोबोट आयआयटी मुंबईमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्टला हजेरी लावणार आहे.
समोर बसलेल्या व्यक्तीला आनंद झालाय की दुःख, तो रागात आहे की गोंधळलेल्या मनःस्थितीत… असे माणसाचे नानाविध मूड अचूक ओळखण्याची क्षमता आईन्स्टाईन रोबोटमध्ये आहे. हाँगकाँगमधील हॅनसन रोबोटीक्सच्या शास्त्रज्ञांनी आईन्स्टाईनची निर्मिती केली आहे. या रोबोटमध्ये चेहरा ओळखण्याचे सॉफ्टवेअर असून आईन्स्टाईनला तब्बल दहा लाखांहून अधिक चेहऱयाच्या विविध छटा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आईन्स्टाईन माणसाच्या मनातील भीती, राग, आनंद, दुःख, निराशा, गोंधळलेली मनःस्थिती अचूक समजू शकतो.
समोर बसलेल्या व्यक्तीचे वयही सांगणार
आईन्स्टाईनमधील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो समोर बसलेली व्यक्ती स्त्रा आहे की पुरुष हेदेखील सांगू शकतो. तसेच त्या व्यक्तीचे अचूक वय ओळखण्याची कलाही आईन्स्टाईनला अवगत आहे. त्यासाठी चेहऱयावरील वैशिष्टय़े हेरण्याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले आहे.
आईन्स्टाईनला प्रश्न विचारण्याची संधी
टेकफेस्टमध्ये आईन्स्टाईनला प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. येत्या 5 जानेवारीला टेकफेस्टमध्ये सहभागी प्रेक्षकांमधील कोणीही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आईन्स्टाईन देणार आहे. या रोबोचा चेहरा हुबेहूब थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासारखाच असून त्यांच्याप्रमाणेच विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर देण्याची कलाही या रोबोटमध्ये आहे.

























































