
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘तारे मोजा आणि वीज वाचवा’ असा ऊर्जाबचतीचा मंत्र पवई येथील ‘आयआयटी’ मुंबईच्या संशोधकांनी दिला. इथे आकाशातले तारे मोजण्याची गरज नाही तर कोणतेही इलेक्ट्रिकल उपकरण घेताना त्याच्यावरील स्टार रेटिंग म्हणजेच ताऱयांची चिन्हे पहा. ज्या उपकरणावर जास्तीत जास्त तारे दिसतील तेच खरेदी करा. कारण अशी उपकरणे ही इतर उपकरणांपेक्षा कमी विजेवरही अधिक कार्यक्षम असतात असा सल्ला आयआयटीच्या संशोधकांनी दिला.
ऊर्जा कार्यक्षमपणे वापरणाऱया उपकरणांमुळे कमी प्रदूषण होते. 2006 मध्ये केंद्र सरकारनेच उपकरणांची ऊर्जा कार्यक्षमता प्रदर्शित करण्यासाठी उपकरणांवर ‘स्टार रेटिंग’ चिन्हे लावण्याची योजना सुरू केली. पूर्वी ती मोजक्या उपकरणांसाठी लागू होती, पण आता एसी आणि फ्रीजवरही त्यांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन उपकरण विकत घेताना ग्राहकांच्या निर्णयावर या चिन्हांचा किती प्रभाव पडतो त्याचा अभ्यास आयआयटी मुंबईच्या ‘सेंटर फॉर टेक्नॉलॉजी आल्टरनेटिव्हज फॉर रुरल एरियाज’चे प्राध्यापक आनंद राव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीषा जैन आणि शास्त्रज्ञांनी केला.
इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये एसी यंत्रणा विकत घेताना ग्राहक स्टार रेटिंगचा अधिक विचार करतात असे या अभ्यासात दिसून आले. एसीच्या वापरामुळे विजेच्या बिलावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे कार्यक्षमपणे ऊर्जा वापरणारी एसी यंत्रणा बसवल्यास विजेचा वापर आणि खर्च कमी होतो. उपकरणांवरील ताऱयांच्या चिन्हांची संख्या पाहून ग्राहक योग्य निर्णय घेऊ शकतात असे संशोधकांनी या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
सर्वेक्षणात आढळले….
स्टार रेटिंग असलेली एसी यंत्रणा विकत घेण्यासाठी ग्राहक 12,500 रुपयांपर्यंत जास्त रक्कम देण्यास तयार होतात.
विशिष्ट ब्रॅण्डसाठी 9 हजारांपर्यंत जास्त रक्कम मोजण्याची तयारी.
3 तारांकित यंत्रणेपेक्षा 5 तारांकित यंत्रणा घेण्यासाठी अतिरिक्त रक्कम देण्याची 62 टक्के ग्राहकांची तयारी.
‘आयआयटी’च्या संशोधकांनी 1184 ग्राहकांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात ग्राहकांनी पुढीलप्रमाणे वेगवेगळी मते व्यक्त केली.
अधिक रेटिंग असलेली उपकरणे कमी वीज वापरतात – 48 टक्के
2 तारांकित यंत्रणेपेक्षा 3 तारांकित यंत्रणा अधिक पसंत – 69 टक्के
2 तारांकित यंत्रणेपेक्षा 5 तारांकित यंत्रणा योग्य – 78 टक्के
प्रत्येक यंत्रणेवर स्टार रेटिंग असायला हवे – 85 टक्के

























































