आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा सीएए कायद्याला पाठिंबा

447

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) काही दिवसांपूर्वी पवई येथील आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. त्याच आयआयटीतील विद्यार्थ्यांनी सोमवारी या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला. शिक्षण संस्थांमध्ये कोणतेही राजकारण आणू नये असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केले.

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून हिंदुस्थानात आश्रयाला आलेल्या अल्पसंख्यांकांचे आपण स्वागत केले पाहिजे आणि ती आपली घटनात्मक जबाबदारी आहे, असे बॅनर्स या विद्यार्थ्यांनी फडकवले. सोमवारी सायंकाळच्या सुमारास या विद्यार्थ्यांनी आयआयटीच्या आवारातच मोर्चा काढून सीएए कायद्याला पाठिंबा दर्शवला.

हिंसाचार आणि शिक्षण संस्थांमध्ये होत असलेल्या राजकारणाविरुद्ध आपण उभे राहिले पाहिजे. सीएए कायद्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. आंदोलकांनी आधी या कायद्याची संपूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच निर्णय घ्यावा असे आवाहन या विद्यार्थ्यांनी केले. सीएए कायद्याची माहिती घेतल्यानंतर प्रत्येकाला समजेल की, हा कायदा कोणत्याही धर्माविरुद्ध नाही आणि या कायद्यामुळे मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व गमवावे लागेल हा निव्वळ गैरसमज आहे असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या