
सामना प्रतिनिधी । मुंबई
पवई येथील आयआयटी मुंबईने जगातील विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये यंदा आघाडी घेतली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा आयआयटी मुंबईने या रँकिंगमध्ये १७ पायऱया वर चढत १६२वा क्रमांक पटकावला. या रँकिंगसाठी आयआयटी मुंबईने १०० पैकी ४८.२ गुण मिळवले.
‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ आज जाहीर करण्यात आली. जगातील विद्यापीठांमधील शिक्षण व संशोधनाचा दर्जा, पायभूत सुविधा व अन्य बाबींचा विचार करून ही रँकिंग बनवली जाते. यंदा या रँकिंगमध्ये सलग सातव्या वर्षी मॅसाच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) जगात पहिला क्रमांक पटकावला. आयआयटी मुंबई या रँकिंगमध्ये गेल्या वर्षी १७९ व्या क्रमांकावर होती. या सूचीमध्ये आयआयटी मुंबईसह हिंदुस्थानातील आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मद्रासने ‘टॉप ५०’मध्ये स्थान मिळवले.
एक हजार विद्यापीठांचे रँकिंग
जगातील एक हजार विद्यापीठांचे रँकिंग करण्यात आले त्यात स्टॅनफोर्ड, हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाने अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला. आशियातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (११), नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर (१२) आणि चीनची त्सिंगुआ युनिव्हर्सिटी (१७) यांनी चांगला रँक मिळवला.
हिंदुस्थानातील विद्यापीठांचे रँक
-आयआयटी मुंबई – १६२
-इंडियन इन्स्टिटय़ूट
ऑफ सायन्सेस – १७०
-आयआयटी दिल्ली – १७२
-आयआयटी मद्रास – २६४
-आयआयटी कानपूर – २८३
-आयआयटी खरगपूर – २९५
-आयआयटी रुरकी – ३८१
-आयआयटी गुवाहाटी – ४७२
-दिल्ली विद्यापीठ – ४८७

























































