आयआयटीच्या संशोधकांनी बनवली जगातील पहिली ‘स्मार्ट स्पीड वॉर्निंग सिस्टम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातात स्टेअरिंग असते, पण वाहनाचा वेग भन्नाट असेल तर चालकाला त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. वेगाची ही नशा अपघाताला कारणीभूत ठरते. वेगामुळे होणारे हे वाहन अपघात आता टाळता येणार आहेत. आयआयटी संस्थांमधील संशोधकांनी ‘स्मार्ट स्पीड वॉर्मिंग सिस्टम’ बनवली आहे. वाहन चालकांना रस्त्यांवरील सुविधा आणि भौगोलिक स्थितीच्या आधारे वेग किती ठेवावा याबाबत ही सिस्टम सतर्क करते. जगातील ही अशा प्रकारची पहिलीच यंत्रणा असून नुकतीच तिची चाचणी मुंबई आणि माळशेज घाटदरम्यानच्या रस्त्यावर घेण्यात आली.

सध्या उपलब्ध असलेली वेग नियंत्रण उपकरणे ही डोंगराळ प्रदेश, सपाट प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेशात तितक्या प्रभावीपणे काम करू शकणार नाहीत असे आयआयटी गुवाहाटी आणि आयआयटी मुंबईतील संशोधकांचे म्हणणे आहे. कारण सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हे एकच उपकरण वापरले जात आहे. त्याला पर्याय म्हणून त्यांनी  ‘स्मार्ट स्पीड वॉर्निंग सिस्टम’ बनवली आहे.

पेटंट मिळवणार

ही सिस्टम जगामध्ये पहिलीच असल्याने आयआयटीचे संशोधक तिचे पेटंट घेणार आहेत. चार पदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 40 वर आसामच्या जोरभाट आणि मेघालयातील नोंगपोह दरम्यानच्या 45 किलोमीटरच्या टप्प्यातील वाहनांच्या वेगाचा सखोल अभ्यास करून ही सिस्टम बनवण्यात आली आहे. महामार्गाच्या या टप्प्यामध्ये 285 आडवी वळणे आहेत. प्रत्येक 30 ते 244 मीटरवर असलेली वळणे ही वेगवेगळी आहेत. त्यात 7 ते 9 टक्क्यांचा फरक आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर मुंबई आणि माळशेज घाटादरम्यानच्या दोन पदरी महामार्गावरील वाहनांच्या वेगाची आकडेवारी मिळवून तिचा अभ्यास केला जात आहे. चार पदरी ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहनांच्या वेगाची माहिती मिळवली गेली आहे असे आयआयटी गुवाहाटीच्या सिव्हिल इंजिनीयरिंग विभागाचे प्राध्यापक अखिलेश कुमार मौर्य यांनी सांगितले. अन्य महामार्गांवरील आकडेवारीही मिळवली जात आहे.