
सामना प्रतिनिधी, मुंबई
पवई येथील आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ महोत्सवाची संकल्पना (थीम) आज जाहीर करण्यात आली. 3 ते 5 जानेवारी या कालावधीत होणाऱया या महोत्सवाची संकल्पना ‘दाविन्सियन स्पेक्टॅकल’ ही कला व विज्ञान क्षेत्रात योगदान देणारे जगविख्यात चित्रकार व संशोधक लिओनार्दो दा विन्सी यांच्याकडून प्रेरित आहे. रोबोवॉर्सबरोबरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सामाजिक जनजागृती असे भरगच्च कार्यक्रम या महोत्सवात आहेत. महोत्सवाची वेबसाईटही आज लॉन्च केली गेली.
यंदाचा 23वा ‘टेकफेस्ट’ महोत्सव आहे. विविध स्पर्धा आणि कार्यशाळांच्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत टेकफेस्ट पोहोचतो. शालेय विद्यार्थ्यांपासून पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी या वर्षी 28 सप्टेंबरपासून देशातील सहा शहरांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. शालेय वयातच विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाची गोडी लागावी म्हणून ‘टेकफेस्ट ऑलिम्पियाड’ होणार आहे. त्यासाठी 2.27 लाखांची बक्षिसेही ठेवण्यात येणार आहेत.
रोबोवॉर्स – हा टेकफेस्टमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू. यात जगातील विविध देशांच्या टीम त्यांचे रोबो घेऊन सहभागी होतात. या वर्षी जिंकणाऱ्या टीमसाठी 10 लाखांचे बक्षीस आहे.
फूल थ्रोटल – यात रिमोट कंट्रोलवर चालणाऱया नायट्रो-बग्गी कार्सची रेस ट्रकवर फायटिंग होते.
मायक्रोमाऊस चॅलेंज – सेन्सर्सच्या सहाय्याने कमीत कमी वेळात चक्रव्यूहाच्या मध्यभागी पोहोचणे. विजेत्याला 2.25 लाखांचे बक्षीस देणार.
फायनान्शियल लिट्रसी अवेअरनेस
या वर्षी विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनण्याचे सूत्र ‘फायनान्शियल लिट्रसीअवेअरनेस’मधून विषद केले जाईल. दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. तसेच महिलांमध्येही आरोग्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
‘वर्ल्ड मन’… विद्यार्थी होणार डिप्लोमॅटस्
वर्ल्ड मन ही एक वादविवाद स्पर्धा आहे. यात जगातील 20 देशांमधील 600हून अधिक विद्यार्थी संयुक्त राष्ट्राच्या विविध 12 समित्यांच्या प्रतिनिधींशी तीन दिवस विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.





























































